द्वारकापीठाच्या शंकराचार्यानी साईबाबांबद्दल केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर काही देवळांमधून साईबाबांच्या मूर्ती हलविण्यात आल्याने निर्माण झालेल्या वादामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.
न्या. टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने याबाबत स्पष्ट केले की, सार्वजनिकहितार्थ याचिकेद्वारे अशा प्रकारच्या प्रश्नांवर न्यायालय निर्णय देऊ शकत नाही. आपल्या पूजेच्या अधिकारावर गदा येत असल्याचे भक्तांना वाटत असल्यास ते स्वामी संपूर्णानंद सरस्वती आणि त्यांचे अनुयायी यांच्याविरोधात दिवाणी अथवा फौजदारी दावा दाखल करू शकतात, असेही पीठाने म्हटले आहे.
श्रद्धा कोणावर ठेवावी याचा निर्णय घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यामुळे न्यायालय याबाबत निर्णय देऊ शकत नाही, न्यायालयाच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्यासारखे हे प्रकरण नाही. त्यामुळे भाविकांनी याबाबत योग्य ठिकाणी दाद मागावी, असेही पीठाने स्पष्ट केले.
साईबाबांविरुद्ध बदनामीकारक वक्तव्य करण्यापासून जनतेला रोखावे, असे आदेश केंद्र सरकारला देण्याबाबत साईधाम धर्मादाय संस्थेच्या वतीने याचिका दाखल
करण्यात आली होती.