पेड न्यूजप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सोमवारी फेटाळण्यात आली. यामुळे नांदेडमधून कॉंग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवत असलेल्या चव्हाण यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १० ए नुसार निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याबद्दल उमेदवारी रद्दबातल करण्याचा अधिकार आहे, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. कोणत्याही उमेदवाराचा निवडणूक खर्च तपासण्याचा निवडणूक आयोगाला अधिकारच नाही, असा युक्तिवाद चव्हाण यांच्या वकिलांनी केला. तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. पुढील ४५ दिवसांत याप्रकरणी रोज सुनावणी घेऊन निकाल द्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. देशातील लोकशाहीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

संबंधीत बातम्या
* ‘पेड न्यूज’ची कीड!
* ‘पेड न्यूज’च्या उगमस्थानी ना नोटीस, ना कारवाई!
* ‘अशोकपर्वा’ची परीक्षा!

२००९मधील विधानसभा निवडणुकीत पेडन्यूज दिल्याप्रकरणी अशोक चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. निवडणूक खर्चात गैरप्रकार केल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र, निवडणूक आयोगाला उमेदवाराचे निवडणूक खर्च तपासण्याचा अधिकारच नाही, असा युक्तिवाद करीत चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली.