कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण भडकावल्याच्या आरोपाखाली मिलिंद एकबोटेंना अटक करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने एकबोटेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष असलेल्या मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी फेटाळला आहे. त्यामुळे मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार भडकवल्याचा एकबोटेंवर आरोप आहे.

यापूर्वीही पुणे सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने एकबोटेंचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे एकबोटेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने गतवेळी त्यांना दिलासा दिला होता. परंतु, सरकारी पक्षाकडून एकबोटे हे तपासासाठी सहकार्य करत नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. परंतु, पोलीसच आपल्याला तपासाला बोलवत नसल्याचे एकबोटेंनी न्यायालयाला सांगितल्याचे म्हटले जाते.

तपासासाठी एकबोटेंना न्यायालयीन नव्हे तर पोलीस कोठडीच गरजेची आहे, अशी भूमिका सरकारी वकिलांनी घेतली. सरकारतर्फे अॅड. निशांत कटनेश्वरकर यांनी दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश मोरे यांच्या तपासाच्या प्रगती अहवालासह प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. एकबोटे यांना दि. २० व २३ फेब्रुवारी रोजी तसेच दि. ५, ९ व १० मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले. शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांची चौकशी केली. मात्र, ते चौकशीत सहकार्य करत नसल्याने त्यांची पोलीस कोठडी आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी विनंती राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली होती. एकबोटेंना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.