सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी ब्रिटनच्या न्यायालयामध्ये नीरव मोदीच्या बाजूने साक्ष देणार असल्याचे म्हटले आहे. पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १४ हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेला आणि पेशाने हिरे व्यापारी असणाऱ्या नीरव मोदीवर सध्या लंडनमधील न्यायालयामध्ये खटला सुरु आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी आपण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नीरव मोदीच्या बाजूने साक्ष देणार असल्याचे काटजू म्हणाले आहेत. या खटल्याची बारकाव्यांबद्दल आपण बोलणार नसून आपण केवळ नीरव मोदीला भारतामध्ये न्याय मिळणार नाही असं न्यायालयाला सांगणार आहोत, असंही काटजू यांनी स्पष्ट केलं आहे.

काटजू यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारने लंडनमधील न्यायालयाकडे नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी केलेल्या याचिकेसंदर्भातील हा खटला नसून अन्य एका खटल्यासंदर्भातील ही सुनावणी आहे. ‘द इकनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये काटजू यांनी यापूर्वीच आपण लेखी साक्ष न्यायालयासमोर सादर केल्याचे सांगितले. भारत सरकारने मागील वर्षीच नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला आहे.

सध्या भारतीय प्रसारमाध्यमे आणि सत्ताधारी सरकारने आधीच त्याला दोषी ठरवलं असल्याने नीरव मोदीला भारतामध्ये स्वतंत्र आणि निष्पक्षपणे सुनावणीची संधी मिळणार नाही, असं काटजू यांनी आपल्या लेखी साक्षीमध्ये न्यायालयाला सांगितलं आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय कायदा मंत्री असणाऱ्या रविशंकर प्रसाद यांनी नीरव मोदीला आधीच दोषी घोषित केलं आहे. एखादा कायदा मंत्री अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला कसं काय दोषी म्हणू शकतो?, आरोपी दोषी आहे की नाही हे ठरवण्याचं काम केवळ न्यायालय करु शकते. मात्र कायदा मंत्र्यांनी थेट निकालच जाहीर केला, असा टोला काटजू यांनी प्रसाद यांना लगावला.

या पुर्वीच काटजू यांनी भारतीय न्यायालय सध्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारच्या बाजूने झुकलेलं दिसत आहे असा आरोप केला आहे. काटजू यांनी अयोध्या मंदिर-मशीद प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरही नाराजी व्यक्त केली होती. शुक्रवारी काटजू न्यायालयासमोर साक्ष देणार आहेत. ब्रिटनमधील क्राउन प्रॉसिक्यूशन सर्विसकडून काटजू यांची चौकशी केली जाणार आहे.

नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी हे दोघेही पीएनबी बँक घोटाळा प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. या प्रकरणामध्ये सीबीआयने आरोपपत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार नीरव मोदीने सहा हजार ४९८ कोटी आणि मेहुल चोक्सीने सात हजार ८० कोटींचा घोटाळा केला आहे. सीबीआयने या प्रकरणामध्ये चौकशी सुरु करण्याआधीच दोघांनी २०१८ साली परदेशात पळ काढला.