बिहारमधील माजी मंत्री मंजू वर्मा यांचा एका महिन्यापासून ठावठिकाणा लागत नसल्याचे पोलिसांनी सुप्रीम कोर्टात सांगितले आहे. वर्मा यांच्या घरी सीबीआयने टाकलेल्या छाप्यात शस्त्रास्त्रं हस्तगत करण्यात आली होती, त्यानंतर त्या फरार झाल्या असून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही असे पोलिसांनी सांगितले. ही माहिती कोर्टात सादर झाल्यावर, धक्का बसलेल्या न्यायाधीश मदन लोकूर यांनी “Fantastic! Cabinet Minister (Manju Verma) on the run, Fantastic!” असे उद्गार काढले.

मुझफ्फरपूर वसतीगृहात लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी सीबीआयनं छापे टाकले होते. यामध्ये वर्मा यांच्या घरावरही छापा मारण्यात आला होता.  मंत्रिमंडळातील मंत्री फरार होते आणि ती कुठे आहे हे कुणालाच ठावूक नाही? असं विचारत हे होऊच कसं शकतं असा सवाल लोकूर यांनी विचारला आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्याचा ठावठिकाणा लागत नाही, यातलं गांभीर्य तुम्हाला कळतं का असं पोलिसांना विचारत, हे अतीच झालं अशी टिप्पणी न्यायाधीशांनी केली आहे.

पुढच्या सुनावणीच्यावेळी बिहारच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी कोर्टात उपस्थित रहावं असा आदेशही त्यांनी दिला आहे. “बिहारच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री फरार आहेत, आणि पोलिस त्यांना एका महिन्यात शोधू शकत नाही हे धक्कादायक आहे. इतकी महत्त्वाची व्यक्ती शोधता का येऊ नये हे पोलिसांनी सांगावं,” असे ताशेरे ओढताना लोकूर यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी कोर्टात हजर व्हावं असा आदेश दिला.

पुढील सुनावणी 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. राज्यातल्या वसतीगृहांमधल्या गैरव्यवस्थापनासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी कोर्टानं बिहारच्या मुख्य सचिवांनाही कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. अशासकीय संस्थांच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या वसतीगृहांमध्ये गैरव्यवस्थापन होत असल्याचे आरोप झाल्यानंतर न्यायालयानं याची दखल घेतली. टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसच्या अहवालानुसार बिहारमधल्या 16 वसतीगृहांमध्ये गैरप्रकार झाल्याचे आढळले आहे.

विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात मंजू वर्मा यांनी बिहारमधल्या न्यायालयात धाव घेत फरार म्हणून घोषित करू नये अशी विनंती केली होती. मंजू वर्मा यांच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठ आढळला असून आर्म्स अॅक्ट अंतर्गत त्यांना अटक होऊ शकते. नितिश कुमार यांच्या मंत्रिमंडळात वर्मा सामाजिक न्याय मंत्री होत्या, मात्र वसतीगृहातील अत्याचारासंदर्भातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर याच्याशी वर्मा यांचे पती चंद्रशेखर वर्मा याचे घनिष्ठ संबंध असल्याचे आढळल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.