युद्धनौका आयएनस विराटची तोडफोड करत भंगारात काढण्याला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. आयएनस विराटला भंगारात काढण्यावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने याचिकेला खूप उशीर झाला असल्याचं सांगत दाखल करुन घेण्यास नकार दिला. मुंबईमधील एका कंपनीने गोवा सरकारच्या मदतीने इतिहासाची साक्षीदार असणाऱ्या आयएनएस विराटला म्युझिअममध्ये रुपांतरित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण गेल्या एक वर्षांपासून सुरु असलेल्या कायदेशीर लढाईत त्यांच्या हाती निराशा आली आहे.

जगात सर्वात जास्त सेवा केलेल्या आयएनएस विराट युद्धनौका सप्टेंबर २०२० मध्ये मुंबईहून गुजरातमधील अलंग येथे पोहोचली होती. जहाज तोडणी कार्यशाळेत तिचे भाग वेगळे करून ते भंगारात विकण्याचं ठरलं होतं.

भारतीय नौदलात १९८७ मध्ये सामील करण्यात आलेली ही युद्धनौका श्रीराम ग्रुपकडून ३८.५४ कोटी रुपयांना घेण्यात आली. आयएनएस विराट ही जगातील सर्वाधिक काळ सेवा केलेली युद्धनौका असून ती सेंटॉर वर्गातील दुसरी विमानवाहू युद्धनौका होती. २९ वर्षे ती नौदलाच्या सेवेत होती व मार्च २०१७ मध्ये ती सेवेतून बाद करण्यात आली. या युद्धनौकेवर सागरी संग्रहालय करण्याचा प्रस्ताव होता, पण जुलै २०१९ मध्ये नौदलाच्या सल्ल्यानेच ही युद्धनौका मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आला असं केंद्र सरकारने संसदेत सांगितलं होतं. २०१४ मध्ये मोडीत काढण्यात आलेल्या आयएनएस विक्रांतनंतरची ही दुसरी युद्धनौका आहे.

१९८२ मध्ये अर्जेटिना विरुद्धचे फॉकलंड युद्ध रॉयल ब्रिटिश नौदलाने जिंकले त्या वेळी ही विमानवाहू युद्धनौका वापरण्यात आली होती. तिचे वजन २७८०० टन असून ब्रिटनच्या नौदलात तिने सेवा केली. १९५९ ते १९८४ या काळात एचएमएस हर्मीस नावाने ती ओळखली जात होती. नंतर या युद्धनौकेची डागडुजी करुन ती भारतीय नौदलात कार्यान्वित करण्यात आली. ८० च्या दशकात भारतीय नौदलाने ६५ दशलक्ष डॉलर्सला ही युद्धनौका घेतली होती, ती १२ मे १९८७ रोजी भारतीय नौदलात सामील करण्यात आली होती.