राजधानी नवी दिल्लीमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदूषणामुळे आणि ट्रफिकच्या समस्येमुळे न राहिलेले बरं असे सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधिशाने म्हटले आहे. शुक्रवारी न्यायालयात न्यायाधीश अरुण कुमार मिश्रा यांनी एका प्रदूषण संबंधित याचिकावर सुनावणी करताना हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, ‘सुरूवातीला दिल्ली मला आकर्षित करत होती, मात्र आता दिल्ली राहण्या योग्य राहिली नाही. येथे प्रदूषण आणि ट्रफिकची समस्या खूप मोठी आहे. ट्रफिक जॅममुळे आज मला न्यायाधिशांच्या शपथ ग्रहन समारंभालाही अनुपस्थित राहिलो असतो.’

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, न्यायाधिश दिनेश माहेश्वरी आणि संजीव खन्ना यांना शुक्रवारी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून शपथ घ्यायची होती. मात्र, ट्रफ्रिक मुळे त्यांना वेळेत पोहचताना कसरत करावी लागली. एकवेळ तर त्यांना असे वाटले की आपण या कार्यक्रमाला पोहचू शकत नाही. पण त्या ट्रफिकमधून ते कार्यक्रमाला पोहचले.

दिल्लीत हवेचे प्रदूषण पुन्हा एकदा वाढले आहे. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांनी डोळ्यांची जळजळ आणि श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. यावरुन परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना येते. याच धर्तीवर न्यायाधिशांनी खेद व्यक्त करत दिल्लीत न राहिलेलं बरं असे वक्तव्य केलं आहे.