सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणात वकीलपत्र सोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला आहे. सरन्यायधीश दीपक मिश्रा, न्या. ए.एम.खानविलकर आणि न्या. डी.वाय.चंद्रचूड यांच्या पीठासमोर ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे आणि पल्लव सिसोदिया यांनी हे प्रकरण सोडण्यासाठी आमच्यावर दबाव आणला जात असल्याचे म्हटले. बार कौन्सिल ऑफ इंडियाने याप्रकरणी आपल्यालाला कारणे दाखवा नोटीस जारी केल्याचे दवे यांनी सांगितले. तर सिसोदिया यांनी दवेंवर माध्यमांत एक लेख लिहून या प्रकरणापासून वेगळे होण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप केला.

दवे हे या प्रकरणात बॉम्बे लॉयर्स असोसिएशनच्या वतीने लढत आहेत. असोसिएशनने मूळ याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले. दुसरीकडे सिसोदिया हे महाराष्ट्रातील एक पत्रकार बी.एस.लोण यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडत आहेत. त्यांनीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात सिसोदिया यांनी पीठासमोर म्हटले की, अॅड. दवे हे दबावाबाबत बोलत आहेत. त्यांनी स्वत: यावर माध्यमांत लेख लिहून या प्रकरणापासून वेगळे होण्याचा दबाव आणला जात असल्याचे म्हटले आहे.

आम्ही किती दबावात काम करत आहोत, याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. एका उद्धिष्टासाठी आम्ही लढत आहोत. हे खूप गंभीर प्रकरण आहे. एका न्यायमूर्तीचा गूढ मृत्यू झाला आहे. आम्ही आमचे हात पाठीमागे बांधून काम करत आहोत. जे समोर दिसतंय तशी परिस्थिती नाही, असे दवे यांनी म्हटले.

दरम्यान, न्यायालयाने वकिलांचे म्हणणे गंभीरपणे घेतले आहे. कोणताही दबाव असो, आम्ही आमचे काम करणार आहोत, असे पीठाने म्हटले. सरन्यायाधीश मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने दवे यांना विश्वास देत त्यांना या खटल्यापासून कोणी रोखू शकणार नसल्याचे म्हटले.