प्रेमाला नकार दिल्याने आलेल्या उद्विग्नतेतून प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करण्याच्या वाढत्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी लवकरच कडक कायदा करण्यात येणार आहे. अ‍ॅसिड अथवा अन्य क्षारयुक्त घटकांच्या विक्रीबाबत ३१ मार्च २०१४ पर्यंत नियमावली तयार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सर्व राज्य सरकारांना दिले.
अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांना प्लास्टिक सर्जरीसह अन्य सर्व उपचार विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्टीकरण सादर करावे, असे आदेशही न्या. आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना १८ जुलै रोजी देण्यात आलेल्या आदेशांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. अ‍ॅसिडच्या विक्रीबाबत केंद्र सरकारने जी नियमावली तयार केली आहे त्याच्याशी सुसंगत अशी नियमावली ३१ मार्चपर्यंत तयार करावी, असे पीठाने म्हटले आहे.