उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाचे नुकसान टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने शिवलिंगावर मिनरल वॉटरच्या पाण्याने अभिषेक करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर न्यायालयाने शिवलिंगावर केला जाणारा दुग्धाभिषेक आणि अन्य पूजा साहित्यावर मर्यादा आणली आहे. शिवलिंगाचे नुकसान कमी करण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने जे उपाय सुचवले होते त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

पूजा कशी झाली पाहिजे हे ठरवण आमचं काम नाही असे कोर्टाने आधीच स्पष्ट केले होते. न्यायालयाने फक्त शिवलिंगाचे नुकसान टाळण्यावर सुनावणी केली. मागच्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात मंदिर व्यवस्थापनाने सुचवलेल्या काही उपायांवर सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली होती. तेव्हापासूनच शिवलिंगावर मिनरल वॉटरच्या पाण्याचे अभिषेक केला जात आहे. त्याचवेळी कोर्टाने दूध आणि दूसऱ्या पूजा साहित्यावर मर्यादा आणली होती.

ऑक्टोंबरमध्ये कोर्टाने काय म्हटले होते

– शक्य असल्यास पूजाऱ्यांशिवाय कोणलाही गर्भगृहात प्रवेश देऊ नये, अन्यथा लोकांची संख्या कमी करावी.

– संपूर्ण दिवस ज्योतिर्लिंगावर पाणी घातल्यामुळे नुकसान होते. त्यामुळे हे प्रमाण कमी करावे.

– शिवलिंगावर गुळ, साखराचा लेप लाऊ नये. धार्मिक कारणास्तव याचा वापर आवश्यक असेल तर तो मर्यादीत प्रमाणात केला जावा.

– फूल आणि बेलाचा सुद्धा मर्यादीत वापर केला पाहिजे. बेलपत्राने झाकून ठेवल्यामुळे शिवलिंग ओले राहते. त्याचबरोबर शिवलिंगापर्यंत हवेचा योग्य प्रवाह पोहोचत नाही.