उत्तर प्रदेशात दहा महिन्यांच्या बालकासह कुटुंबातील सात जणांना ठार केल्याच्या प्रकरणी महिला व तिच्या प्रियकरास ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. २००८ मध्ये उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेत फार घाईने निकाल देताना अनिवार्य मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करण्यात आले असे न्यायालयाचे म्हणणे आहे.
अमरोहा येथील सत्र न्यायालयाने २१ मे रोजी दोघांना फाशीची शिक्षा सुनावली पण तो निकाल फार घाईने देण्यात आला, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली व त्यासाठी तीस दिवसांची वाट पाहिली नाही व आरोपींना या निकालावर फेरविचार याचिका दाखल करण्यास अवधी दिला नाही. शबनम व तिचा प्रियकर सलीम हे उत्तर प्रदेशच्या राज्यपालांकडे दयेची याचिका दाखल करू शकतात किंवा इतर कायदेशीर मार्ग वापरू शकतात असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
कायदेशीर मार्गाची संधी न देताच सत्र न्यायाधीशांनी फाशीच्या शिक्षेवर स्वाक्षरी केली आहे, असे न्या. ए.के.सिक्री व यू.यू. ललित यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालय व अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालपत्रात याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. फाशीच्या शिक्षेवर स्वाक्षरी झाली म्हणजे राज्यघटनेने कलम २१ अन्वये दिलेला जगण्याचा अधिकार संपत नाही. फाशीची शिक्षा झालेल्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे फाशीची शिक्षा देताना योग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन आवश्यक होते. त्यामुळे २१ मे रोजी दिलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की मोरादाबादच्या तुरुंग अधीक्षकांनी शबनमला जिथे ठेवले होते, तेथे फाशीचे वॉरंट आल्यानंतर ते परत पाठवले कारण त्यात फाशीची तारीख व वेळ दिली नव्हती. सलीमला आग्रा तुरुंगात ठेवले आहे. वॉरंट चुकीचे होते. मार्गदर्शक तत्त्वाचे पालन केले गेले नाही असे उत्तर प्रदेश सरकारने मान्य केले. अतिरिक्त महाधिवक्ता पिंकी आनंद यांनी केंद्राच्या वतीने बाजू मांडताना सांगितले, की मार्गदर्शक तत्त्वे व नियमांचे पालन केले जाईल. शबनम यांचे वकील आनंद ग्रोव्हर यांनी सांगितले, की फेरविचार याचिका दाखल करण्यात येईल. १ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने जोडप्याची फाशीची शिक्षा उचलून धरली पण १४ दिवसांनी सविस्तर निकालात आरोपींचे अपीलही फेटाळले होते. २०१३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोघांना २०१० मध्ये सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा उचलून धरली होती.
सलीम व शबनम यांचे प्रेमसंबंध होते व त्यांना विवाह करायचा होता त्याला शबनमच्या घरून विरोध होता. १५ एप्रिल २००८ रोजी  अमरोहा येथे तिच्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी १० महिन्यांच्या बाळासह घरातील सर्वाची हत्या केली. सलीमला गुन्हा करण्यात तिने मदत केली होती. तिने तिच्या कुटुंबीयांना गुंगीचे औषध दिले होते व नंतर तिने दहा महिन्याच्या पुतण्याचा गळा दाबून त्याला ठार केले होते