संपत्तीच्या वादातून स्वत:च्या पाच मुलींची हत्या केल्याप्रकरणी मगनलाल बरेला याला फाशी देण्यास पुढील आदेश येईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याला गुरुवारी सकाळी फासावर लटकवण्यात येणार होते.
सरन्यायाधीश पी सतशिवम यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मगनलालच्या फाशीला स्थगिती दिली. बरेलाच्या फाशीविरोधात मानवाधिकार संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. संघटनेचे कार्यकर्ते सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास बरेलाच्या फाशीला स्थगिती देण्यात आली.
आपल्या दोन पत्नींशी संपत्तीवरून झालेल्या वादात ११ जून २०१० रोजी मगनलालने कुऱ्हाडीने आपल्या पाच मुलींची हत्या केली होती. मध्य प्रदेशातील सेओरा येथे ही घटना घडली होती.
त्याला जबलपूर येथील मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी फाशी दिले जाणार होते. दरम्यान आपला पती निरपराध असल्याचा दावा मगनलालच्या दोन्ही पत्नींनी केला आहे. आमच्या पतीला झाडाला बांधून या हत्या करण्यात आल्याचे संतो आणि बसंती यांनी न्यायालयात सांगितले.
पाच साक्षीदार फितूर झाले असतानादेखील सरकारी पक्षाने भक्कम पुरावे गोळा केले. प्रतिकूल परिस्थितीत आम्ही आरोपीला जास्तीस्त जास्त शिक्षा करू शकलो, असे सेहोरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुनील मेहता यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2013 2:59 am