कुप्रसिद्ध चंदनतस्कर वीरप्पन याच्या चार साथीदारांच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. कर्नाटकातील जंगलात सुरुंगस्फोट घडवून १९९३ मध्ये २२ पोलिसांची हत्या केल्याबद्दल या चौघांना २००४ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणी आता उद्या, बुधवारी सुनावणी होईल.
सरन्यायाधीश अल्तमस कबीर, न्यायमूर्ती ए.आर.दवे व विक्रमजीत सेन यांच्या पीठापुढे या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर सुनावणी झाली. वीरप्पनच्या चार साथीदारांच्या वतीने समिक नारायण यांनी अर्ज केला होता. तो दाखल करून घेण्यास अ‍ॅटर्नी जनरल जी.ई.वहानवटी यांनी तांत्रिक आक्षेप घेतले.
या अर्जाच्या प्रती केंद्र व राज्य सरकारला सोमवारी सकाळपर्यंत उपलब्ध झाल्या नव्हत्या, असे त्यांचे म्हणणे होते. यावर योग्य पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती अर्जदारांच्या वतीने करण्यात आली. ती खंडपीठाने मान्य केली.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडे दयेसाठी अर्ज केले होते. ते फेटाळण्यात आले. या निर्णयाला त्यांनी आव्हान दिले आहे. या संदर्भात वीरप्पनच्या साथीदारांनी केलेल्या अर्जावरील सुनावणी महत्त्वाची आहे, असे पीठातर्फे स्पष्ट करण्यात आले. वीरप्पनचा मोठा भाऊ ज्ञानप्रकाश, सायमन, मदैया आणि बिलवेंद्रन या चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.