नवी दिल्ली : केरळमध्ये अकरावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलावून घेण्याच्या (ऑफलाईन) राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. सध्या देशातील एकूण दैनंदिन करोना रुग्णांपैकी ७० टक्के हे केरळमध्ये नोंदले जात आहेत. अशा वेळी या वयातील मुलांच्या आरोग्याची जोखीम घेता येणार नाही, असे न्यायालय म्हणाले.

ही परीक्षा ६ सप्टेंबरपासून सुरू होणार होती.  याप्रकरणी पुढील सुनावणी १३ तारखेला होणार आहे. ऑफलाईन परीक्षेचा निर्णय  घेण्यापूर्वी राज्य सरकारने रोगप्रसाराच्या जोखमीबाबत पुरेसा विचार केलेला  नाही, या याचिकाकर्त्यांच्या दाव्यात तथ्य दिसून येते, असे न्या. ए. एम. खानविलकर, न्या. हृषिकेश रॉय आणि सी. टी. रविकुमार यांच्या पीठाने नमूद केले.

याआधी सरकारच्या परीक्षेविषयीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास केरळ उच्च न्यायालयाने नकार दिला होता. हा राज्याचा धोरणात्मक निर्णय असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्याला आव्हान देण्यात आले आहे.

उपचाराधीन रुग्णसंख्येत वाढ

देशात करोना रुग्णसंख्येत किंचित घट झाली असून गेल्या २४ तासांत ४५,३५२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३६६ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ  झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले आहे.  उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ९९ हजार ७७८ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या १.२२ टक्के इतकी नोंदली गेली आहे. गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णांची संख्या १०१९५ ने वाढली आहे.