बेहिशेबी मालमत्ता प्रकरण
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या विरोधातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर ज्या आव्हान याचिका सादर झाल्या आहेत त्यावर रोजच्या रोज सुनावणी घेतली जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्या. पी. सी.घोष, आर. के. अगरवाल यांनी जुलैत ही अपिले दाखल करून घेताना कर्नाटक उच्च न्यायालयाने जयललिता यांना आरोपमुक्त करण्याच्या निकालास स्थगिती दिली नव्हती, पण आता न्यायालयाने संबंधित पक्षकारांच्या मते या प्रकरणातील कुठल्या मुद्दय़ांना आव्हान दिले आहे व त्यावर ८ जानेवारीला न्यायालयाने निकाल द्यायचा आहे हे स्पष्ट करण्यात यावे असे सांगितले. सर्व पक्षकारांनी आम्ही नेमके कुठल्या मुद्दय़ावर निकाल देणे अपेक्षित आहे हे सांगावे असे न्यायालयाने आज सांगितले.

कर्नाटक सरकारने दिलेल्या निकालावरील आव्हान याचिकांवर २७ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने नोटिसा जारी केल्या होत्या. कर्नाटक उच्च न्यायालयाने जयललिता, त्यांच्या सहकारी शशिकला व नातेवाईक व्ही. एन. सुधाकरन व इलावरसी यांना निर्दोष सोडून दिले होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांचा हस्तक्षेप अर्ज मान्य केला असून त्यांची याबाबत कोणते मुद्दे मांडायची इच्छा आहे त्याची यादी द्यावी असे स्पष्ट केले आहे.