News Flash

अयोध्याप्रकरणी उद्या सुप्रीम कोर्ट सुनावणार ऐतिहासिक निर्णय

यापूर्वी १६ ऑक्टोबर रोजी याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली होती, त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

(संग्रहित छायाचित्र)

देशातील सर्वात जुना खटला असलेल्या अयोध्या प्रकरणावर उद्या (दि.९) सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्ट निकाल सुनावणार आहे. यापूर्वी १६ ऑक्टोबर रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती, त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. या निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेशातील शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्था ९ ते ११ नोव्हेंबर या काळात बंद राहणार आहेत.

पाच ऑगस्ट पासून दररोज या प्रकरणी सुनावणी सुरु होती. ही सुनावणी १६ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाली. दरम्यान, १७ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्त होत असल्याने तत्पूर्वी हा निकाल येणे निश्चित होते. त्यानुसार, आता उद्या यावर अंतिम निकाल येणार आहे. उद्या सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्ट हा निकाल देणार आहे. १३४ वर्षांचा हा जुना खटला असून त्यावर येणारा उद्याचा अंतिम निकाल हा ऐतिहासिक निकाल असणार आहे.

दरम्यान, कालच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्याकडील सर्व महत्वाच्या तत्काळ सुनावणीचे खटले नियोजित सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्याकडे सोपवले होते. त्यावरुनच लवकरच अयोध्येवर निकाल येऊ शकतो याची चर्चा सुरु होती. सरन्यायाधीश गोगोई यांच्या निवृत्तीसाठी केवळ चारच कामकाजाचे दिवस शिल्लक राहिले असल्याने उद्याचाच दिवस हा निकालाचा दिवस निवडला गेला असावा असे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या निवासस्थानी भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नेत्यांनी मुस्लिम धर्मगुरु, विचारवंत आणि अभ्यासकांची नुकतीच भेट घेतली. यावेळी निकालानंतर सामाजिक सलोखा आणि एकात्मता कशी टिकवून ठेवण्याची त्यावर चर्चा झाली. यामध्ये आरएसएसकडून कृष्ण गोपाळ, रामलाल आणि माजी मंत्री शहानवाझ हुसेन तसेच मुस्लिम समाजातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. कुठल्याही परिस्थितीत सामाजिक सलोखा, बंधुत्व, एकात्मता अधिक बळकट करण्याचा निर्धार या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांनी व्यक्त केला होता. सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय असेल त्याचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे. शांतता राखण्याचे आम्ही सर्वांना आवाहन करु असे शिया धर्मगुरु मौलाना सय्यद कालबी जावाद माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 9:22 pm

Web Title: supreme court to deliver verdict on ayodhya matter tomorrow aau 85
Next Stories
1 राम मंदिरासाठी मुस्लिम समाजाने पुढाकार घ्यावा: मुस्लिम राष्ट्रीय मंच
2 मोदी सरकार गांधी कुटुंबाची SPG सुरक्षा हटवणार
3 आम्हाला समजेल असा निकाल द्या; सुप्रीम कोर्टाची मुंबई हायकोर्टाला विनंती
Just Now!
X