भारतीय राज्यघटनेतून ‘इंडिया’ शब्द काढून टाकावा आणि केवळ ‘भारत’ हे नाव ठेवावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

घटनेतील कलम १ मध्ये सुधारणा करून इंडिया हा शब्द हटवावा, असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे. संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये सुधारणा करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. हा अनुच्छेद देशाच्या नावाशी संबंधित आहे. यामध्ये बदल करून इंडिया या इंग्रजी नावाऐवजी भारत नाव वापरावं, अशी मागणी याचिकेमध्ये आहे.


दिल्लीतील एका व्यक्तीने ही याचिका केली आहे. यापूर्वी, शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र, सरन्यायाधीश शरद बोबडे अनुपस्थित असल्यानं सुनावणी यादीतून हे प्रकरण वगळण्यात आलं. त्यानंतर आज (दि.२) सरन्यायाधीश शरद बोबडे , न्या. ए.एस. बोपन्ना आणि न्या. ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने सध्या सर्वोच्च न्यायालयात केवळ तातडीच्या याचिकांवर सुनावणी सुरु आहे.