अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशिद प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.  सुप्रीम कोर्टातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. यामध्ये न्या.रंजन गोगोई, न्या. बोबडे, न्या. चंद्रचूद, न्या. अब्दुल नाजीर आणि न्या. अशोक भूषण यांचा समावेश असणार आहे. 2010 मध्ये अलहाबाद हायकोर्टाने राम मंदिर आणि बाबरी प्रकरणात जो निकाल दिला त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या 14 याचिकांवर हे खंडपीठ सुनावणी करणार आहे.

खरंतर याप्रकरणी 29 जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र खंडपीठातील पाच न्यायाधीशांपैकी न्या. बोबडे हे सुट्टीवर होते, त्यामुळे या तारखेला सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिराच्या जागी पूजा करण्याचा अधिकार मिळावा म्हणून एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेचा समावेशही सुनावणी दरम्यान तातडीने केला जावा अशीही मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

सुब्रमण्यम स्वामींनी मंगळवारी (आज) सुप्रीम कोर्टात हजर रहावे असे न्या. रंजन गोगोई आणि न्या. संजीव खन्ना यांनी म्हटले आहे. ज्यानंतर आपण दाखल केलेल्या याचिकेचा उल्लेख करत सुब्रमण्यम स्वामी यांनी या याचिकेवरही त्वरित सुनावणी घ्यावी अशी विनंती केली. तुम्ही कोर्टात उपस्थित रहा, आम्ही विचार करू असे उत्तर गोगोई यांनी यावर दिले आहे.

राम मंदिर प्रकरणात नव्या खंडपीठाची स्थापना करण्यात आली. 10 जानेवारीला या प्रकरणी सुनावणी होणार होती. मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी आधीच्या खंडपीठात मुस्लिम व्यक्ती न्यायाधीश नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे नव्या खंडपीठात न्या. अब्दुल नाजीर यांचा समावेश करण्यात आला. त्याआधी न्या. यू. यू. ललित यांनी या खंडपीठातून माघार घेतली होती. राम मंदिराचा विषय गेल्या वर्षभरापासून चर्चेत आला आहे. निवडणुकांच्या तोंडावर सुनावणी दरम्यान काय होणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.