नवी दिल्ली : रामजन्मभूमी- बाबरी मशीदप्रकरणी जमिनीच्या दाव्यासंबंधी करण्यात आलेल्या याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालय ४ जानेवारीला करणार आहे.

हे प्रकरण सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. एस. के. कौल यांच्या खंडपीठापुढे सुनावणीला ठेवण्यात आले आहे.

रामजन्मभूमीची २.७७ एकर जागा सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांना समान विभागून द्यावी, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने चार दिवाणी दाव्यांमध्ये दिला होता. या आदेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या १४ अपिलांच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीशांचे पीठ तीनसदस्यीय खंडपीठाचे गठन करण्याची शक्यता आहे.

रामजन्मभूमी प्रकरणाची सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात ‘योग्य त्या’ खंडपीठासमोर होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबरला सांगितले होते. त्यानंतर, जानेवारीपूर्वी या प्रकरणाची तातडीने सुनावणी करावी यासाठी काही जणांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता, परंतु आपण यासंबंधी पूर्वीच आदेश पारित केला असल्याचे सांगून न्यायालयाने ही विनंती नाकारली होती.

अयोध्या प्रकरणातील मूळ पक्षकार असलेले एम. सादिक यांच्या कायदेशीर वारसांनी दाखल केलेल्या अपिलामध्ये एक प्रतिवादी असलेल्या अखिल भारत हिंदू महासभेने या खटल्याच्या जलद सुनावणीसाठी अर्ज केला होता.