अयोध्या जमीन वादाच्या खटल्यावर 26 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. घटनापीठातील पाच न्यायाधीशांपैकी एक न्यायाधीश शरद बोबडे हे सुट्टीवरुन परतले आहेत.

यापूर्वी 29 जानेवारी रोजी या खटल्याची सुनावणी निश्चीत कऱण्यात आली होती. पण त्यादिवशी न्या. बोबडे उपस्थित नव्हते, परिणामी सुनावणी लांबणीवर पडली होती. त्यावेळी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ 29 जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी घेणार नाही असं स्पष्ट केलं होतं, पण सुनावणीसाठी पुढील तारीख निश्चीत करण्यात आली नव्हती. अखेर आता 26 फेब्रुवारी रोजी या खटल्याची सुनावणी होणार आहे.

सरन्यायाधीशांच्या अध्यतेखालील या घटनापीठात शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण, एस. नझीर या न्यायाधीशांचा समावेश आहे. मूळ घटनापीठाचे सदस्य असलेले न्या. उदय लळित यांनी माघार घेतल्यामुळे पाच सदस्यांचे नवे खंडपीठ 25 जानेवारीला स्थापन करण्यात आले होते. यात न्या. एन. व्ही. रामण यांना वगळण्यात आले.