राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) माजी खासदार आणि बिहारमधील बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीनला सर्वोच्च न्यायालयाने जबर दणका दिला आहे. २००४ मध्ये सिवान येथे झालेल्या दोन भावांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला असून शहाबुद्दीनची उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळली.

सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने शहाबुद्दीनच्या वकिलांना काही प्रश्न विचारले. दुहेरी हत्या प्रकरणात साक्ष देण्यासाठी न्यायालयात जात असतानाच राजीव रोशनची हत्या का आणि कशी झाली?  मग या हत्येमागे कोणाचा हात होता? असे काही प्रश्न न्यायालयाने त्यांना विचारले, आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये दखल देणार नाही असं स्पष्ट करत याचिका फेटाळली.

काय आहे प्रकरण – १६ ऑगस्ट २००४ मध्ये सीवान येथील व्यापारी चंद्रशेखर प्रसाद उर्फ चंदाबाबू यांच्या गिरीश, सतीश आणि राजीव या तीन मुलांचे अपहरण झाले होते. यापैकी गिरीश आणि सतीश यांना अॅसिडने अक्षरशः आंघोळ घालून हत्या करण्यात आली होती. तर राजीव हा शहाबुद्दीनच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर गिरीशची आई कलावतीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे शहाबुद्दीनविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, काही दिवसांतच या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या राजीवलाही अॅसिड हल्ला करून संपविण्यात आले होते. नितीशकुमार यांनी २००६ मध्ये बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर शहाबुद्दीनची रवानगी तुरूंगात झाली होती. त्यावेळी नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेड आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) या दोन्ही पक्षांमधून विस्तवही जात नव्हता.