कोइम्बतूर येथे २०१० मध्ये दहा वर्षांच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर, तिची व तिच्या भावाची हत्या केल्याच्या प्रकरणात दोषीला ठोठावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी शिक्कामोर्तब केले.

हा क्षणिक संतापातून किंवा भावनेच्या भरात झालेला गुन्हा नव्हता, तर सुनियोजित पद्धतीने आखलेला आणि सावधपणे अमलात आणलेला गुन्हा आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. न्यायालयाने या प्रकरणी १ ऑगस्टला दिलेल्या निकालाचा फेरविचार करण्याचे काहीच कारण नाही, असे सांगून न्या. आर. एफ. नरिमन व न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने बहुमताच्या आदेशाने दोषी मनोहरन याची फेरविचार याचिका फेटाळून लावली. तिसरे न्यायाधीश संजीव खन्ना यांनी १ ऑगस्टच्या आदेशान्वये दोषीला फाशीऐवजी उर्वरित आयुष्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुचवली होती, त्यावर ते कायम राहिले.

आपण दिलेला कबुलीजबाब बळजबरीने घेण्यात आला होता, तसेच आपला सहआरोपी मोहनकृष्णन हा नोव्हेंबर २०१० रोजी पोलीस कोठडीत मरण पावल्यामुळे आपण मानसिक तणावाखाली होतो, या आधारावर मनोहरन याने १ ऑगस्टच्या निकालाचा फेरविचार करण्याची मागणी केली होती.