करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परीस्थिती बिघडत चालली आहे. देशात वैद्यकीय साधनांची कमतरता भासत आहे. दिल्लीत देखील ऑक्सिजनची टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खबरदारीचा इशारा दिला आहे. न्यायालयात आज ऑक्सिजन संकटाबाबत सुनावणी घेण्यात येत आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्राने न्यायालयात म्हटले आहे की, त्यांच्या सर्वेक्षणानुसार सध्या दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा आवश्यक साठा उपलब्ध आहे. ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेन आज 280 मेट्रिक टन ऑक्सिजन आणत आहे. दिल्लीच्या 56 प्रमुख रुग्णालयांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात त्यांच्याकडे पुरेसा साठा आहे.

तसेच दिल्ली सरकारने 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी केली होती. यावर केंद्राने न्यायालयात भूमिका मांडली. जर दिल्लीला 700 मेट्रिक टन ऑक्सिजन दिलं जात असेल तर इतर राज्यात कमतरता भासेल. दिल्लीच्या 56 प्रमुख रुग्णालयांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात त्यांच्याकडे पुरेसा साठा आहे.

ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. परंतु तो लोकांपर्यंत पोहोचत नाही, याचा अर्थ दिल्लीतील काही भागात गोंधळ उडाला आहे. त्यामुळे ऑक्सिजन ऑडिट करणे आवश्यक असल्याचे केंद्राने सांगितले. यावर न्यायालयाने सरकारला काही सुचना केल्या. हा विषय अखिल भारतीय पातळीवर पाहण्याची गरज आहे. ऑक्सिजनचे ऑडिट करणे आवश्यक आहे. तिसरी लाट येण्याची चर्चा आहे, अशा परिस्थितीत सरकारने दिल्लीत ऑक्सिजनची कमतरता नसल्याचे सुनिश्चित केले पाहिजे.

इतर राज्यांकडे देखील लक्ष दिले पाहिजे

ऑक्सिजनचे योग्य ऑडिट आणि वितरणासाठी योग्य चौकट असणे आवश्यक आहे. त्यामुळे इतर राज्यांकडे देखील लक्ष दिले पाहिजे, असे सरकारला न्यायालयाने सुचविले.

न्यायमूर्ती शाह म्हणाले की, ‘आपण आता दिल्लीकडे पाहत आहोत. पण ग्रामीण भागाचे काय, जेथे बहुतेक लोक समस्येला तोंड देत आहेत. तुम्हाला राष्ट्रीय धोरण बनवण्याची गरज आहे. तुम्ही आजची परिस्थिती पाहत आहात. पण आम्ही भविष्याकडे पाहत आहोत, त्यासाठी तुमची काय योजना आहे?’ न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी न्यायालयात काही प्रश्न उपस्थित केले. आपण तंत्रज्ञानाद्वारे उपचार करता येणाऱ्या डॉक्टरांची टीम तयार करू शकतो का? दुसरी लाट हाताळण्यासाठी आपल्याकडे मनुष्यबळ नाही. तिसर्‍या लाटेसाठीही मनुष्यबळ नाही. आपण त्यात फ्रेश ग्रॅज्युएट डॉक्टर आणि नर्स वापरु शकतो का? तिसर्‍या लाटेत डॉक्टर आणि परिचारिका थकलेल्या असतील. तेव्हा काय करणार? काही बॅकअप तयार करावा लागेल.

दिल्लीत काही मोठी रुग्णालये वगळता अन्य रुग्णालयांमध्ये सिलिंडर आहेत. तेथे फक्त १२ तासांचा साठा आहे. अशा परिस्थितीत पुरवठा केला जातो. कोविड संकटात ऑक्सिजन पुरवठा दुप्पट केल्याचे केंद्र सरकारने सांगितले.

यावर न्यायमूर्ती शाह म्हणाले, ‘तुम्ही जेव्हा हे दावे करीत असता, तेव्हा बरीच मोठी रुग्णालये न्यायालयात अशी विनवणी का करतात की आमच्याकडे केवळ दोन किंवा तीन तासांचे ऑक्सिजन शिल्लक आहे?’ यावर केंद्राने म्हटले आहे की ‘ऑक्सिजन ऑडिट करणे आवश्यक आहे. पुरवठा केला जात आहे. परंतु तो लोकांपर्यंत पोहोचत नसेल. तर याचा अर्थ काही दिल्लीच्या काही भागात काहीतरी गडबड आहे.