सर्वोच्च न्यायालयाची वेबसाईट supremecourtofindia.nic.in डाउन झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची एसआयटी चौकशी करणारी जनहित याचिका फेटाळल्यानंतर थोड्याच वेळात ही वेबसाइट डाउन झाली आहे. दुसरीकडे, ब्राझीलच्या हॅकर्सनी ही वेबसाइट हॅक केल्याचं वृत्त सोशल मीडियावर फिरत आहे. त्यासोबत एक स्क्रीनशॉटदेखील शेअर केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट ओपन करण्याचा प्रयत्न केला असता ‘This site can’t be reached’ असा संदेश दिसत आहे. अनेकदा प्रयत्न केल्यानंतरही वेबसाइट ओपन होत नाहीये. मात्र, नेमकी ही वेबसाइट हॅक झालीये की मेंटेनन्ससाठी डाउन करण्यात आली आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट देखील हॅक झाल्याचं वृत्त आलं होतं, पण त्यावेळी वेबसाइट हॅक नाही तर डाउन झाली होती असं सरकारने नंतर स्पष्टीकरण दिलं होतं.