News Flash

सुप्रिया सुळेंचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र, म्हणाल्या “मोहन डेलकर यांची आत्महत्या हा तर थेट…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे.

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. मात्र, दुसरीकडे राजकीय वर्तुळात देखील या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप केले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान देखील या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनाच पत्र पाठवलं असून त्यामध्ये मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “मोहन डेलकर यांची आत्महत्या हा फक्त एका जिवाचा अंत नसून तो थेट देशाच्या संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

आपल्या पत्रात सुप्रिया सुळे म्हणतात, “सात वेळा खासदार राहिलेले मोहन डेलकर यांनी लोकसभेत केलेल्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांच्यावर असलेल्या प्रचंड मानसिक तणावाविषयी आणि दादरा-नगर हवेलीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर टाकल्या जात असलेल्या दबावाविषयी पोटतिडकीने सांगितलं होतं. त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. पण संसदेचं स्वातंत्र्य आणि सर्वोच्च स्थान हे सभागृहातल्या सदस्यांना कोणत्याही प्रकारच्या भिती वा दबावाशिवाय काम करण्याच्या मिळणाऱ्या वातावरणात सामावलेलं आहे.”

“डेलकरांच्या आरोपांची चौकशी करा”

दरम्यान, या पत्रामध्ये सुप्रिया सुळे यांनी मोहन डेलकर यांच्या आरोपांची चौकशी करण्याची विनंती लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. “आपण या सभागृहाचे पालक आहात. त्यामुळे मोहन डेलकर यांनी या सभागृहात केलेल्या आरोपांची चौकशी करावी आणि हे प्रकरण संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवावं, अशी मी आपल्याला विनंती करते”, असं सुप्रिया सुळेंनी पत्रामध्ये नमूद केलं आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली असल्याची माहिती देखील सुप्रिया सुळे यांनी सभागृहात दिली.

नेमकं काय आहे प्रकरण?

दादरा नगर हवेलीचे ५८ वर्षीय खासदार मोहन संजीभाई डेलकर यांनी मुंबईच्या सी ग्रीन साऊथ हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येआधी त्यांनी १४ पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. ही नोट पोलिसांच्या हाती लागली असून यामध्ये अनेक राजकीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे असल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी रात्री डेलकर यांनी आत्महत्या केली. सोबत आणलेल्या शालीच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतला. त्यामुळे, आत्महत्या करण्याचं ठरवूनच ते मुंबईत आले आणि हॉटेलमध्ये थांबले, असा तर्क देखील लावला जात आहे.

डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; गृहमंत्र्यांची घोषणा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 3:29 pm

Web Title: supriya sule letter loksabha speaker on mohan delkar suicide case pmw 88
Next Stories
1 ममता बॅनर्जी या फक्त ‘निवडणुकीपुरत्या हिंदू’; केंद्रीय मंत्र्याची टीका
2 दांडी यात्रेच्या पुनर्रचनेला पंतप्रधान दाखवणार झेंडा
3 गूगल डूडलने केला ‘भारताच्या सॅटेलाईट मॅन’चा सन्मान
Just Now!
X