अमेरिकेत एका भारतीय दांपत्याचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मूळचे बीडच्या अंबाजोगाईमधील असणाऱ्या या दांपत्याची मुलगी बाल्कनीत एकटी उभी राहून रडत असताना शेजाऱ्यांनी पाहिलं असता ही घटना उघडकीस आली. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिल आहे. अमेरिकेच्या काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, न्यू जर्सीमधील नॉर्थ अर्लिंग्टन येथील अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असणाऱ्या दांपत्याचा चाकूने वार झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून, रुद्रवार दांपत्याच्या तीन वर्षीय मुलीच्या मदतीसाठी परराष्ट्रमंत्रालयाकडे मागणी केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “मूळचे बीडचे असलेले बालाजी भारत रूद्रवार हे पत्नी आरती आणि मुलीसोबत न्यू जर्सी येथे राहत होते. बालाजी आणि त्यांची पत्नी आरती हे मृतावस्थेत आढळले आहेत. मी परराष्ट्रमंत्री एस जयशंकरप्रसाद, अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालय’मदत’ यांना विनंती करते की, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं व चौकशी करण्याबाबतच्या सूचना द्याव्यात.”

तसेच, “अशी देखील विनंती करते की, त्यांची तीन वर्षीय मुलगी जी कुणाचीही मदत नसल्याने एकटीच आहे तिला मदत करावी आणि तिला भारतात परत आणण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी.” असं देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे..

बीडच्या दांपत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू

बालाजी यांचे वडील भारत रुद्रवार यांनी पीटीआयशी बोलताना दिलेल्या वृत्तानुसार, “माझी नात बाल्कनीत एकटीच रडत असल्याचं पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घरात प्रवेश करुन पाहिलं असता मृतदेह आढळले”. वैद्यकीय तपासणीत चाकूने भोसकलं असल्याचं समोर आलं असल्याचं रिपोर्टमध्ये आहे.