News Flash

Video : भररस्त्यावर तरुणाला कानशिलात लगावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा माफीनामा, पदही गमावलं!

छत्तीसगडमध्ये भररस्त्यावर तरुणाला कानशिलात लगावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची गच्छंती!

शनिवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये एक जिल्हाधिकारी भररस्त्यावर एका तरुणाला कानशिलात लगावताना दिसत आहे. सोशल मीडियावर नेटिझन्सनी यावर चर्चा सुरु केल्यानंतर त्यातलं सत्य समोर आलं. व्हिडिओमध्ये तरुणाला कानशिलात लगावणारे छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा आहेत. या गैरवर्तणुकीबद्दल त्यांना तातडीने पदावरून हटवल्याचं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जाहीर केलं आहे. यासंदर्भात आयएएस अधिकारी रणबीर शर्मा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून माफी देखील मागितली आहे. देशातील आयएएस वर्तुळातूनही रणबीर शर्मा यांच्या या वर्तनावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

नेमकं घडलं काय?

शनिवारी अनेक नेटिझन्सनी ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका देखील केली. सूजरपूर जिल्ह्यामध्ये करोनाकाळात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील अनेकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं दिसून येत आहे. सदर २३ वर्षीय तरूण आपल्या बाईकवरून जात असताना जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी तरुणाला हटकलं.

 

जिल्हाधिकारी संतापले आणि…

दरम्यान, तरुणाने आधी आपण लस घेण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. पण त्याच्याकडची पावती ही लसीकरणाची नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने पुन्हा आपण वृद्ध आजीला भेटायला जात असल्याचं सांगितलं. पण तरुणाच्या खोटेपणामुळे संतप्त झालेल्या रणबीर शर्मा यांनी त्याचा फोन जमिनीवर आपटून फोडला. एवढंच नाही, तर त्याच्या कानशिलात देखील लगावली. त्याहीपुढे जात त्यांनी आपल्यासोबतच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही तरुणाला मारण्यास सांगितलं.

 

थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!

हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची दखल अखेर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी घेतली. “सोशल मीडियावर सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांच्याकडून एका तरुणाशी गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही एक दु:खद आणि निंदनीय घटना आहे. छत्तीसगडमध्ये असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. रणबीर शर्मा यांना तातडीने हटवण्याचे निर्देश देण्या आले आहेत”, असं ट्वीट मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केलं आहे.

 

जिल्हाधिकाऱ्यांचा माफीनामा!

दरम्यान, रणबीर शर्मा यांनी देखील काय घडलं ते सांगताना माफी मागितली आहे. “जेव्हा मी त्यांना थांबवलं, तेव्हा ते म्हणाले की मी लस घेण्यासाठी जातो आहे. त्यांनी पावती दाखवली जी लसीकरणाशी संबंधित नव्हती. नंतर ते म्हणाले की मी माझ्या आजीला पाहायला जात आहे. त्यांनी गैरवर्तन केलं आणि मी रागात त्याला कानशिलात लगावली. मी माझ्या या वर्तनासाठी माफी मागतो”, असं रणबीर शर्मा यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 11:41 am

Web Title: surajpur collector chhattisgarh viral video slapping a man violating lockdown rules pmw 88
Next Stories
1 दिलासादायक! करोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत घट
2 “भाजपात प्रवेश करून चूक केली, दीदीशिवाय नाही राहू शकत”
3 भारतीयांचा परदेशप्रवास अवघड
Just Now!
X