सूरत शहरातील कॅनरा बँकेत काम करणाऱ्या महिला बँक कर्मचाऱ्याला पोलीसाने धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बँकेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनीही याची दखल घेत, दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होईल असं आश्वासन दिलं आहे. पोलीस अधिकाऱी आणि बँक कर्मचारी यांच्यात नेमकं काय झालं याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण साध्या वेशात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने महिलेशी वाद घालून तिला धक्काबुक्की केल्याचं दिसत आहे.

या प्रकारानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी या पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निर्मला सितारामन यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालत सुरत शहराच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की केलेल्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबीत करण्यात आलेलं असून बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

सध्याच्या खडतर काळात बँक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे, असं म्हणत सितारामन यांनी या घटनेचा निषेध केला आहे.