14 फेब्रुवारीच्या दिवशी जम्मू काश्मीर या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे चाळीस जवान शहीद झाले. या घटनेचा निषेध देशभरातून नोंदवला जातो आहे. सगळा देश या घटनेमुळे सगळा देश हळहळला आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेधही व्यक्त केला जातो आहे. अशात सुरत येथील एका हिरे व्यापाऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नाचे रिसेप्शन रद्द केले आहे. तसेच 11 लाखांची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचाही निर्णय या हिरे व्यापाऱ्याने घेतला आहे. देवशी माणेक असे या हिरे व्यापाऱ्याचं नाव आहे. शुक्रवारी त्याच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर रिसेप्शनही पार पडणार होतं. मात्र पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून या हिरे व्यापाऱ्याने मुलीच्या लग्नाचे रिसेप्शन रद्द करून 11 लाखांची रक्कम शहीदांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

14 फेब्रुवारीला झालेला हल्ला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घडवला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्या अशी मागणी होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सगळ्या सैन्यदलांना जशास तसे उत्तर देण्याची मोकळीक दिली आहे. तसेच आजच पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनीही दहशतवादाविरोधात आम्ही सरकारसोबत आहोत असे म्हटले आहे. तर आता सुरत येथील हिरे व्यापाऱ्याने मुलीच्या लग्नाचे रिसेप्शन रद्द करून 11 लाखांचा निधी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला आहे.