सुरतमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीत शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांसह २० जण मरण पावल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी शिकवणी वर्गाच्या मालकाला अटक केली आहे.

या आगीत किशोरवयीन मुलांचा बळी गेला आहे. दरम्यान सुरतमधील सर्व शिकवणी वर्ग आग प्रतिबंधक यंत्रणा बसवल्या जात नाहीत तोपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींची गय केली जाणार नाही असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी म्हटले आहे.

सारठाणा भागात असलेल्या तक्षशिला संकुलात शुक्रवारी ही आग लागली होती. त्या इमारतीचे दोन बिल्डर फरार झाले आहेत, असे सुरतचे पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांनी सांगितले. पोलिसांनी  प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला असून त्यात दोन बिल्डर, शिकवणी वर्गाचा मालक यांची नावे आहेत. एकाला अटक करण्यात आली आहे.

शिकवणी वर्गाचा मालक भार्गव बुटानी असून त्याला अटक केली आहे. बिल्डर हर्शुल वेकारिया व जिग्नेश पालिवाल हे फरार झाले आहेत त्यांचा शोध जारी आहे. मरण पावलेले विद्यार्थी किशोरवयीन होते. काहीजण धुरामुळे गुदमरून मरण पावले तर काहीजण खिडकीतून उडय़ा मारल्यानंतर मरण पावले. तक्षशिला संकुलात आग लागली असताना मुले  वरून उडय़ा मारतानाचे थरारक दृश्य चित्रफितींमध्ये दिसले होते. किमान १० विद्यार्थ्यांनी खिडकीतून उडय़ा मारल्या.  राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना  प्रत्येकी चार लाखांची भरपाई जाहीर केली आहे.

मृतांपैकी तीन विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण

आगीत मरण पावलेल्या वीस विद्यार्थ्यांपैकी ३ विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. शनिवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. मृतांमध्ये १६ मुलींचा समावेश आहे. मृतांपैकी यशी केवडिया, मानसी वारसानी व हस्ती सुरानी या बारावी परीक्षेस बसल्या होत्या. त्या गुजरात मंडळाच्या या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. यशस्वी हिला ६५.७५ पर्सेटाइल, मानसीला ५२.०३ पर्सेटाइल, हस्तीला ६९.३९ पर्सेटाइल गुण मिळाले आहेत.