केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पाचवी अटक करण्यात आली आहे. वसीम असे या आरोपीचे नाव आहे अशीही माहिती समोर आली असून तो या गोळीबाराचा मास्टरमाईंड होता असेही समजते आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा त्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तुलही जप्त केले आहे. पोलिसांना पाहताच वसीमने गोळीबार सुरू केला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या चकमकीत एक पोलीस आणि वसीम दोघेही जखमी झाले आहेत.

अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना हरवत विजय मिळवला. या विजयात सुरेंद्र सिंह यांचे मोठे योगदान होते. मात्र निकालानंतर दोन दिवसातच पाच जणांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली. याआधी पोलिसांनी तिघांना अटक केली होती. आता पाचही जणांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. नसीम, धर्मनाथ गुप्ता, रामचंद्र आणि गोलू या चौघांना अटक करण्यात आली होती. आता पाचवा आरोपी आणि मास्टरमाईंड वसीम यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तुलही जप्त केले आहे.

सुरेंद्र सिंह हे स्मृती इराणी यांचे विश्वासू कार्यकर्ते होते. त्यांची मागच्या शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.अमेठीतील बरौलिया गावाचे ते प्रमुख होते. आता त्यांच्या हत्येप्रकरणी सगळ्या म्हणजेच पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.