उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये शनिवारी रात्री खासदार स्मृती इराणी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांच्या हत्येमुळे एकच खळबळ माजली आहे. स्मृती इराणी स्वत: सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आज रविवारी दिल्लीहून अमेठीत आल्या. भावूक झालेल्या स्मृती यांनी सुरेंद्र सिंह यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यावेळी स्मृती इराणी यांचे आश्रू अनावर झाले होते. सुरेंद्र सिंह यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याचं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलं.

खूनी पाताळात जरी लपला असला तरी शोधून काढू आणि फाशीची शिक्षा व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयातही लढू, असे भावनिक झालेल्या स्मृती इराणी यावेळी म्हणाल्या. सुरेंद्र सिंह यांच्या अंत्ययात्रेदरम्यान राज्य सरकारमधील मंत्री आणि आमदारही उपस्थित होते. दुपारी तीन वाजताच्या दरम्यान स्मृती इराणी सुरेंद्र सिंह यांच्या घरी पोहचल्या. सर्व प्रथम त्यांनी सिंह यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर मृत सुरेंद्र सिंह यांच्या पत्नी, आई-वडिल आणि मुलांना भेटून सात्वंन केले. परिवाराची जबाबदारी घेऊ असेही यावेळी त्यांनी सिंह यांच्या कुटुंबाना अश्वासन दिले.

सुरेंद्र सिंह अमेठीतील बरौलिया गावाचे प्रमुख होते. शनिवारी रात्री उशीरा काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर गोळी झाडली. उपचारासाठी त्यांना लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्मृती इराणी यांच्या प्रचारामध्ये सुरेंद्र सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सुरेंद्र सिंह यांचा प्रभाव अनेक गावांमध्ये असल्याने त्याचा स्मृती इराणी यांना लाभ मिळाला होता.