देशातील सर्वाधिक गतिमान एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मंगळवारी हिरवा झेंडा दाखवला. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानक ते आग्रा कॅंटॉन्मेंट दरम्यान ही एक्स्प्रेस धावणार असून, त्याचा वेग जास्तीत जास्त १६० प्रतिकिलोमीटर इतका असणार आहे. देशातील ‘सेमी बुलेट ट्रेन’ म्हणून याच्याकडे पाहिले जात आहे. ‘गतिमान एक्स्प्रेस’ असे या रेल्वेसेवेचे नाव आहे. दिल्लीतून निघालेल्या या रेल्वेने नेहमीपेक्षा कमी वेळेत आग्रा गाढले आहे.
सहा एप्रिलपासून ही एक्स्प्रेस अधिकृतपणे या दोन्ही स्थानकांदरम्यान धावणार आहे. तुघलकाबाद ते आग्रा या दरम्यान रेल्वेचा वेग १६० किलो मीटर प्रतितास इतका असणार आहे. तर त्यापूर्वी ही एक्स्प्रेस १२० किलोमीटर प्रतितास या वेगाने धावेल, असे रेल्वे खात्याने म्हटले आहे. दिल्ली ते आग्रा हे अंतर ९० मिनिटांमध्ये पार करण्यात यावे, अशी रेल्वे खात्याची मूळ कल्पना होती. पण त्यामध्ये नंतर सुधारणा करण्यात येऊन १०० मिनिटांपर्यंत त्यात वाढ करण्यात आली. हजरत निजामुद्दीन स्थानकावरून सुटल्यावर ही गाडी १०० मिनिटांत आग्राला पोहोचेल, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ही गाडी मंगळवारी धावली.
या गाडीचे तिकीट शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा जास्त ठेवण्यात आले आहे. गाडीमध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेअरकारचे मिळून १२ डबे असणार आहेत.