करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे लोकांनी स्वत:ला घरामध्ये कोंडून घेतल्याचे चित्र दिसलं तर दुसरीकडे याच कारणामुळे लोकांचे मद्यप्राशन करण्याचं प्रमाणही वाढल्याचं दिसून आलं आहे. लंडनमधील किंग्स कॉलेज रुग्णालयामधील लीव्हर युनिटने यासंदर्भातील खुलासा केला आहे. दारुमुळे यकृतावर होणाऱ्या परिणामांसंदर्भातील रुग्णाचे म्हणजेच एआरएलडी रुग्णाचे प्रमाण वाढल्याचा दावा रुग्णालयाने केलाय. करोनाच्या चिंतेमुळे लोकांचे मद्यप्राशन करण्याचे प्रमाण वाढले असून ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

किंग्स कॉलेज रुग्णालयातील या सर्वेक्षणानुसार २०२० साली जून महिन्यामध्ये २०१९ च्या जून महिन्याच्या तुलनेत यकृताशी संबंधित आजारांचे अधिक रुग्ण दाखल झाल्याचे दिसून आलं. धक्कादायक बाब म्हणजे ही वाढ थोडीथोडकी नसून ४८.५ टक्के इतकी आहे. यापैकी एक चतुर्थांश रुग्णांची परिस्थिती अगदी चिंताजनक झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं, द डेली मेलने दिलेल्या वृत्तात म्हटलं आङे. पब्लिक हेल्थ इंग्लंडने केलेल्या नुकत्याच केलेल्या एका विश्लेषणानुसार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान अतिरिक्त प्रमाणात मद्यप्राशन करण्याची संख्या दुप्पटीने वाढली. एआरएलडी प्रकारच्या आजारांमध्ये अल्कोहोल म्हणजेच मद्याचा शरीरावर गंभीर परिणाम होतो आणि त्याचा सर्वाधिक फटका यकृताला बसतो. आकडेवारीनुसार या अशा आजारांमुळे जवळजवळ आठ हजार लोकं दरवर्षी दगावतात. भीती, एकटेपणा आणि कंटाळा या तीन कारणांमुळे लोकांचे मद्यप्राशन करण्याचे प्रमाण वाढल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

आणखी वाचा- आता धोका Disease X चा; इबोला शोधणाऱ्या डॉक्टरने दिला करोनापेक्षाही भयंकर विषाणूच्या संसर्गाचा इशारा

याच दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी रविवारी करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या नियमांना अधिक कठोर करण्याची गरज निर्माण होऊ शकते असा इशारा दिला आहे. ब्रिटनमध्ये सध्या करोनाचा नवीन स्ट्रेन चिंतेचा विषय ठरत असून करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागील आहे. करोनाचा वाढता प्रुदुर्भाव पाहता देशातील शिक्षक संघटनांनी काही आठवड्यांसाठी देशातील शाळा बंद ठेवाव्यात अशी मागणी केलीय. मात्र जॉनसन यांनी रविवारी पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवा कारण शाळा सुरु ठेवण्यात आल्यात. मुलांना या करोनाचा प्रादुर्भावाचा धोका खूपच कमी असल्याचा दावा बोरिस यांनी केलाय. देशामधील करोनाबाधितांची संख्या एका आठवड्यात ५७ हजारांहून अधिकने वाढली आहे. तर मृतांची एकूण संख्या ७५ हजारांपर्यंत पोहचलीय. त्यामुळेच करोनाचे नवे निर्बंध पुन्हा ब्रिटनमध्ये लागू होऊ शकतात असा इशारा पंतप्रधानांनी दिलाय.