महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता रेल्वे प्रवासादरम्यानही कात्री लागणार आहे. राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या एक्सप्रेसच्या तिकीटदरात ९ सप्टेंबरपासून १० टक्क्यांनी दरवाढ होणार आहे.

राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या एक्सप्रेसमध्ये लवचिक भाडे धोरण अर्थात फ्लेक्सी फेअर सिस्टमनुसार दर आकारणी सुरु करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यानुसार सुरुवातीच्या  १० सीटला सध्याचे विद्यमान दरच लागू असतील. पण त्यानंतरच्या सीटसाठी तुम्हाला १० टक्के जास्त पैसे मोजावे लागतील. दर दहा सीटनंतर या दरात वाढ होत जाणार आहे.  म्हणजेच १० टक्के सीट भरल्यानंतर ११ ते २० टक्के जागांसाठी तुम्हाला बेस प्राईजच्या १० टक्के जास्त भाडे मोजावे लागेल. तर ५० टक्के सीट भरल्यानंतर उर्वरित ५० टक्के जागांसाठी प्रवाशांना सुमारे दीड पट भाडे द्यावे लागणार आहे. वातानुकूलित डब्यातून प्रवास करणा-या प्रवाशांना प्रत्येक १० टक्के सीटमागे अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. शेवटच्या १० सीटसाठी प्रवाशांना दुप्पट दराने भाडे भरावे लागेल.

शताब्दीच्या चेअरकारच्या प्रवाशांना आणि दुरांतोच्या स्लीपर आणि द्वितीय वर्गातील प्रवाशांनाही हेच धोरण लागू होणार आहे. ९ सप्टेंबरपासून हे नवीन दर लागू केले जातील अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे. ज्या प्रवाशांनी ९ सप्टेंबरच्या अगोदर तिकीटची नोंदणी केली आहे अशा प्रवाशांना प्रवासादरम्यान अतिरिक्त पैसे भरावे लागतील असेही रेल्वेच्या अधिका-यांनी स्पष्ट केले.