जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 हून जास्त जवान शहीद झाल्याच्या अवघ्या 12 दिवसांमध्येच भारताने पाकिस्तानाला चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या बॉम्बहल्ल्यात ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 12 मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या कारवाईत मोठया संख्येने जैशचे दहशतवादी, ट्रेनर, सिनियर कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे पाकिस्ताननेही हल्ला झाल्याचं मान्य केलं आहे, पण कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे.

जाणून घेऊया गेल्या 11 दिवसात काय घडलं –  

  • 15 फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेचे एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंह धनोआ यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी एअर स्ट्राइकचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सरकारकडून तातडीने मंजुरी देण्यात आली.
  • 16 ते 20 फेब्रुवारी – यानंतर भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराने हेरॉन ड्रोनच्या आधारे नियंत्रण रेषेवर(एलओसी) टेहाळणी सुरू केली.
  • 20-22 फेब्रुवारी – या दरम्यान भारतीय वायुसेना आणि गुप्तचर संस्थांनी हल्ला (स्ट्राइक) करण्यासाठी संभाव्य ठिकाणं निश्चित केली.
  • 21 फेब्रुवारी – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासमोर हल्ला (स्ट्राइक) करण्यासाठीच्या संभाव्य ठिकाणांबाबत माहिती देण्यात आली आणि हल्ला(स्ट्राइक) करण्यासाठीचं लक्ष निश्चित करण्यात आलं.
  • 22 फेब्रुवारी – भारतीय वायुसेनेच्या 1 स्क्वाड्रन ‘टायगर्स’ आणि 7 स्क्वाड्रन ‘बॅटल अॅक्सिस’ला हल्ल्याच्या मोहिमेसाठी ( स्ट्राइक मिशन) सज्ज करण्यात आली. याशिवाय मोहिमेसाठी दोन मिराज स्क्वाड्रनमधील 12 जेट निवडण्यात आले.
  • 24 फेब्रुवारी : पंजाबच्या भटिंडा येथून वॉर्निंग जेट आणि उत्तर प्रदेशच्या आग्रा येथून विमानात हवेत इंधन भरण्याचा सराव करण्यात आला.
  • 25 फेब्रुवारी – या दिवशी ऑपरेशन सुरू करण्यासाठी 12 मिराज विमानं तयार करण्यात आली. स्ट्राइक करण्याआधी मिराजच्या वैमानिकांनी लक्ष्य निश्चीत केलं. पाकिस्तानच्या मुजफ्फराबादमध्ये लेझर गाइडेड बॉम्बद्वारे (लक्ष्य अचूक साधणारे बॉम्ब) हल्ला करण्यात आला. रात्री 3.20 ते 4 वाजेदरम्यान ही कारवाई फत्ते करण्यात आली.
  • 26 फेब्रुवारी – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोहीम फत्ते झाल्याबाबत माहिती दिली.