पुलवामा येथे भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 हून जास्त जवान शहीद झाल्याच्या अवघ्या 12 दिवसांमध्येच भारताने पाकिस्तानाला चांगलाच धडा शिकवला आहे. यावरून आपमधून भाजपामध्ये गेलेल्या नेत्या शाझिया इल्मी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. आता भारताने दिलेल्या या तोडीस-तोड उत्तराचे पुरावे केजरीवाल आणि काँग्रेस गँग मागणार नाहीत अशी अपेक्षा ठेवते, असे खोचक ट्विट त्यांनी केले आहे.

उरी हल्ल्यानंतरही भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. या सर्जिकल स्ट्राईकावर केजरीवाल आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेत पुरावे मागितले होते. आता पुन्हा एकदा भारताने सर्जिकल स्ट्राईक केला आहे. याचे पुरावे मागणार नाहीत ही अपेक्षा, असे खोचक ट्विट शाझिया इल्मी यांनी केले आहे. पाकिस्तानला दिलेल्या या तोडीस-तोड उत्तराचे केजरीवाल आणि काँग्रेस गँग पुरावे मागणार नाहीत असी आशा आहे. भारत मातेच्या या दुर्गारूपाला शतशत नमन!!, असे ट्विट शाझिया इल्मी यांनी केले आहे.

दरम्यान, भारतीय वायुसेनेच्या धडाकेबाज कारवाईचं सर्वच स्तरांतून कौतुक होतंय. नेटिझन्सकडून ‘हाऊज द जैश… डेड सर’ असा हॅशटॅग ट्रेंड करुन ट्विटरवर आनंद व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, शिवसेनेनेही भारतीय वायुसेनेचं अभिनंदन केलं आहे. पण अभिनंदन करतानाच, जैशच्या सैतानाला – अझर मसूदला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

केजरीवाल यांचे ट्विट –

ट्विटरद्वारे केजरीवाल यांनी भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांना सलाम ठोकला आहे. भारतीय वायुसेनेच्या शूर वैमानिकांना माझा सलाम, तुमच्यामुळे आज अभिमानाचा क्षण अनुभवायला मिळाला अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवालय यांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 हून जास्त जवान शहीद झाल्याच्या अवघ्या 12 दिवसांमध्येच भारताने पाकिस्तानाला चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या बॉम्बहल्ल्यात ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 12 मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या कारवाईत मोठया संख्येने जैशचे दहशतवादी, ट्रेनर, सिनियर कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे पाकिस्ताननेही हल्ला झाल्याचं मान्य केलं आहे, पण कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे.