भारताच्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भारतीय सैन्याचे आभार मानतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. ‘आजच्या कारवाईनंतर मोदींच्या खंबीर नेतृत्वाखाली देश सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले’, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

पुलवामा येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राइक केले. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. अमित शाह म्हणतात, भारतीय सैन्याच्या शौर्यासाठी मी त्यांना सलाम करतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो. आजच्या कारवाईने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सुरक्षित आहे.

आजची कारवाई भारताची इच्छाशक्ती दाखवते. भारताचा संकल्प यातून दिसून येतो. हा नवीन भारत कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेणार नाही. दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांनाही भारत माफ करणार नाही, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भारताच्या विमानांनी २१ मिनिटे कारवाई केली आहे. यातील पहिला हवाई हल्ला ३ वाजून ४५ मिनिटांनी झाल्याचे समजते. खैबर पख्तुनवा प्रांतातील बालाकोट येथे पहाटे पावणे चार ते ३ वाजून ५३ मिनिटांपर्यंत हवाई दलाने बॉम्ब हल्ला केला. बालाकोटनंतर पहाटे ३. ४८ ते ३. ५५ अशी सात मिनिटे मुझफ्फराबाद येथे कारवाई करण्यात आली. यानंतर चाकोटी येथे पहाटे ३.५८ ते ४ वाजून ४ मिनिटांपर्यंत हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगितले जाते. ही कारवाई सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीे अॅक्शन रुममध्ये उपस्थित होते, असे समजते.