भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या मिराज फायटर विमानांनी पहाटे 3.30च्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईला परराष्ट्र मंत्रालयानेही दुजोरा दिला आहे. पण भारताने पाकिस्तानवर केलेल्या या कारवाईबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच अंदाज वर्तवला होता, आणि त्यांचा अंदाज अगदी खरा ठरला आहे.

14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 हून जास्त भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर या घटनेवर प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं होतं. ‘सध्या भारत-पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून परिस्थिती धोकादायक आहे. आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. काश्मीरमधील तणाव कमी व्हावा, अशी आमची इच्छा आहे. भारताने पुलवामा येथील हल्ल्यात 40 जवानांना गमावले आहे आणि ते खूप कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहेत, त्यांची मनस्थिती मी समजू शकतो’, असे ट्रम्प म्हणाले होते. त्यानंतर आज पाकिस्तानवर केलेल्या कारवाईमुळे ट्रम्प यांचं म्हणणं भारताने अवघ्या आठवडाभरातच खरं ठरवलं आहे.

भारताच्या विमानांचा बॉम्बवर्षाव –
पाकिस्तानी हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 12 मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार सुमारे 12 मिराज 2000 लढाऊ विमानांनी सीमा पार करून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यात दहशतवादी तळ पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी येथील जैश ए मोहम्मदचे तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत.