देशभरातील महाविद्यालये तसेच विद्यापीठांमध्ये २९ सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईक दिवस साजरा करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही हा दिवस साजरा केला जाणार आहे. ‘जेएनयू’चे अनेक माजी विद्यार्थी लष्करात भरती झाले असून आपण त्यांच्या कार्याची दखल घेतलीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी दिली.

विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्जिकल स्ट्राईक दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. यावरुन राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पश्चिम बंगालमधील शिक्षण मंत्र्यांनी हा दिवस साजरा केला जाणार नाही, असे म्हटले आहे. केंद्रातील भाजपा सरकारने सर्जिकल स्ट्राईकवरुन राजकारण सुरू केले असून आम्ही याचा विरोध करतो. बंगालमधील महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये सर्जिकल स्ट्राईक डे साजरा केला जाणार नाही, असे शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी सांगितले होते.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू जगदीश कुमार यांनी या निर्देशांवर प्रतिक्रिया दिली आहे. जेएनयूतही २९ सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईक दिवस साजरा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. जेएनयूचे अनेक माजी विद्यार्थी सैन्यात कार्यरत होते. विद्यापीठ म्हणून आम्ही त्यांच्या देशसेवेची दखल घेतलीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारानंतर लष्कराच्या कमांडोंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चार तासांत सर्जिकल स्ट्राईकची कारवाई पार पाडली होती. यात पाकिस्तानचे नऊ सैनिक व ५० दहशतवादी ठार झाल्याचा दावा सैन्याने केला होता. हा दिवस आता सेनादलांच्या कार्याला नागरिकांकडून सलामी देण्यासाठी साजरा केला जाणार आहे. राष्ट्रीय छात्रसेनेचे संचलन, निवृत्त सेना अधिकाऱ्यांच्या मुलाखती, चर्चात्मक कार्यक्रम, प्रदर्शने तसेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सैनिकांना पत्र पाठवणे आदी माध्यमांमधून महाविद्यालये व विद्यापीठांनी हा दिवस साजरा करावे, असे आयोगाने सुचवले आहे.