भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असतानाही नियंत्रण रेषेनजीक सीमेपलीकडे होणारा व्यापार नेहमीप्रमाणेच सुरू होता. सलामाबाद येथून ३९ मालमोटारींनी दुपारी १ वाजल्यानंतर अमन सेतू येथील कमान चौकी पार केली.

मिरच्या, जिरे, सुका मेवा आणि एम्ब्रॉयडरी केलेल्या वस्तू लादलेले ३९ ट्रक्स सलामाबादहून रवाना झाले, तर आंबे, सुका मेवा आणि आयुर्वेद औषधी वस्तू घेऊन मुझफ्फराबाद येथून १३ ट्रक भारतात आले. माल रिकामा केल्यानंतर पाकिस्तानी ट्रक मुझफ्फराबादला परत जातील, तर आपले २६ चालक कमान चौकीमार्गे परत येतील, असे सांगून सलामाबाद येथील नियंत्रण रेषेपलीकडे होणाऱ्या व्यापाराचे कस्टोडियन फारुक अहमद शाह यांनी गुरुवारी हा व्यापार सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. गेले तीन महिने बंद राहिल्यानंतर सीमेपलीकडील व्यापार मंगळवारी सुरू झाला होता. या व्यापारासाठी शुक्रवारचा आणखी एक दिवस आमच्याजवळ आहे, असे ते म्हणाले.

बुऱ्हान वानी हा दहशतवादी ८ जुलैला मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे सीमेपलीकडील व्यापार लगेच बंद करण्यात आला होता. गुरुवारी मालांचे ‘क्रॉसिंग’ भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. सुरक्षाविषयक आणि कस्टम चाचण्या पार पडल्यानंतर ट्रक्स कमान चौकीपर्यंत नेण्यात आले.

श्रीनगर ते मुझफ्फराबाद दरम्यान कारवाँ-ए-अमन ही बससेवा सुरू झाल्यानंतर विश्वास निर्माण करण्याचा भाग म्हणून २००८ साली सीमेपलीकडे व्यापार सुरू करण्यात आला होता. आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या ८०० व्यापाऱ्यांनी अदलाबदल तत्त्वावर यासाठी नोंदणी केली आहे.

 

उद्योग जगताकडून आश्वासन

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून लष्कराने केलेल्या कारवाईचे उद्योगजगताने स्वागत केले आहे. सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ असून, देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आतापर्यंतची कारवाई प्रतिकात्मक होती, मात्र आता कठोर कारवाईची वेळ आली आहे, अशी ट्विप्पणी बयोकॉनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किरण मुजुमदार-शॉ यांनी केली आहे. अशा वातावारणाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही. शेअर बाजारातील चढउतार तात्कालिक असेल असे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष महेश गुप्ता यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानला भारताची निर्यात केवळ ०.८३ टक्के आहे. तर आयात नाममात्र ०.१३ टक्के इतकी आहे. त्यामुळे अशा संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था सक्षम असल्याचे असोचेमचे सरचिटणीस डी.एस.रावत यांनी स्पष्ट केले. शेअर बाजारात काही काळ चिंतेचे वातावरण असले तरी भारतीय अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे असोचेमने स्पष्ट केले आहे.

 

रेल्वे स्थानकांत कडेकोट बंदोबस्त

मुंबई : पाकव्याप्त काश्मिरातील कारवाईनंतर देशभरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दलाने मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील सुरक्षेत वाढ केली आहे. त्याचप्रमाणे सुरक्षा दलाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या १६ कमांडोंची नियुक्तीही महत्त्वाच्या स्थानकांवर केली आहे. हे कमांडो चार महत्त्वाच्या स्थानकांवर चोख बंदोबस्त ठेवणार असून गरज पडल्यास इतर स्थानकांवरही धाव घेऊ शकतात, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी स्पष्ट केले.

सीएसटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर आणि ठाणे या स्थानकांमध्ये तैनात असलेल्या या कमांडोंकडे या स्थानकांप्रमाणेच जवळच्या स्थानकांचा नकाशा उपलब्ध असेल. त्या आधारे त्यांना संपूर्ण स्थानकाची माहिती समजणे सहज शक्य होणार आहे.

हे कमांडो रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार, पादचारी पूल, पार्किंगची जागा आदी ठिकाणी घिरटय़ा घालणार असून काही अनुचित प्रकार आढळल्यास कमांडो त्वरित कारवाई करणार आहेत.