उद्योगजगताचे स्पष्टीकरण; कठोर कारवाईला पाठिंबा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून लष्कराने केलेल्या कारवाईचे उद्योगजगताने स्वागत केले आहे. सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ असून, देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आतापर्यंतची कारवाई प्रतिकात्मक होती, मात्र आता कठोर कारवाईची वेळ आली आहे, अशी ट्विप्पणी बयोकॉनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किरण मुजुमदार-शॉ यांनी केली आहे. अशा वातावारणाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही. शेअर बाजारातील चढउतार तात्कालिक असेल असे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष महेश गुप्ता यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानला भारताची निर्यात केवळ ०.८३ टक्के आहे. तर आयात नाममात्र ०.१३ टक्के इतकी आहे. त्यामुळे अशा संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था सक्षम असल्याचे असोचेमचे सरचिटणीस डी.एस.रावत यांनी स्पष्ट केले. शेअर बाजारात काही काळ चिंतेचे वातावरण असले तरी भारतीय अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे असोचेमने स्पष्ट केले आहे.

निर्यायदारांच्या संघटनेचे प्रमुख अजय सहाय्य यांनी याचा परिणाम भारताच्या इतर देशांच्या व्यापारावर होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. पाकिस्तानला सर्वाधिक पसंतीचा देशाच्या दर्जाबाबत फेरविचार करण्याच्या भूमिकेने भविष्यात त्या देशाबरोबर व्यापारी संबंध सुरळीत होतील काय याची निर्यातदारांना काही प्रमाणात चिंता असल्याचे त्यांनी सांगितले.