यूपीए सरकारच्या काळात भारतीय सैन्याने कधीही सर्जिकल स्ट्राइक केले नव्हते, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले आहे. मात्र पर्रिकर यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.

‘मी दोन वर्षांपासून संरक्षण मंत्री आहे. माझ्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय सैन्याने एकही सर्जिकल स्ट्राइक केलेला नाही. त्यांच्या (काँग्रेस) कडून सीमावर्ती भागात असलेल्या सैन्याकडून करण्यात आलेल्या कारवायांची माहिती दिली जात आहे. अशा कारवाया जगभरात नेहमीच केल्या जातात,’ अशा शब्दांमध्ये पर्रिकर यांनी भारतीय सैन्याने पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राइक केल्याचा आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे सारे श्रेय हे भारतीय सैन्यालाच जाते. आपण केवळ त्याचा एक भाग होतो. त्याचबरोबर ही कृती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवला, याबद्दल मोदींचे आभार मानले पाहिजेत, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत मांडले.

मनोहर पर्रिकर यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. सरकारकडून सर्जिकल स्ट्राइकचा राजकीय वापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ‘सर्जिकल स्ट्राइकचे पूर्ण श्रेय भारतीय जवानांना जाते. मात्र जवानांनी आधी केलेले सर्जिकल स्ट्राइक नाकारुन त्यांच्या पराक्रमाचा आणि त्यागाचा अपमान का केला जातो आहे ?’, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. २०११ मध्ये करण्यात आलेल्या ऑपरेशन जिंजरबद्दल पर्रिकर गप्प का, असा प्रश्नही सुरजेवाला यांनी विचारला आहे.

‘सर्जिकल स्ट्राईक हे कोणत्याही एका पक्षामुळे झालेले नाहीत. भारतीय सैन्याची ती कामगिरी होती. त्यामुळे त्याचे श्रेय भारतीय सैन्यालाच जाते. संपूर्ण देशवासियांनी याचे श्रेय घेतले तरी माझी त्यास कोणतीही हरकत नाही. सर्जिकल स्ट्राईक्सबद्दल ज्यांच्या मनात अजूनही शंका आहेत. त्यांनीही याचे श्रेय घेतले तरी माझी कोणतीही हरकत नाही,’ असे मत मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले.

पर्रिकर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. ‘जर सर्जिकल स्ट्राइकचे संपूर्ण श्रेय सैन्याला जाते, मग या हल्ल्याचे श्रेय घेणारे आणि मोदींचा फोटो असणारे फलक निवडणूक होऊ घातलेल्या उत्तर प्रदेशात का लावले जात आहेत ?’, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतात होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कराने २८ सप्टेंबरच्या रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक्स केले होते. दहशतवाद्यांचे अड्डे या कारवाईत उदध्वस्त करण्यात आले होते. लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी या कारवाईबद्दल पत्रकारांना माहिती दिली होती.