वीज बिलाच्या दरात मोठे बदल होणार आहेत. लवकरच विजेचा जास्त वापर करणाऱ्यांना कमी बिल भरावे लागणार आहे. वीजेचा वापर वाढावा यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे. देशातील विजेची निर्मिती वाढत असल्याने हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजेचा जास्त वापर म्हणजे जास्त बिल हे समीकरण आता कालबाह्य होणार आहे.

विजेच्या अधिकाधिक वापराला प्रोत्साहन मिळावे, यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने विजेचा जास्त वापर करणाऱ्यांकडून बिल आकारण्याची शिफारस केली आहे. देशातील विजेची मागणी वाढावी, यासाठी या समितीने ही शिफारस केली आहे. त्यामुळे लवकरच विजेचा अधिक वापर करणाऱ्यांना कमी बिल भरावे लागू शकते.

‘सध्या अस्तित्वात असलेली वीज बिल आकारण्याची रचना देशामधील विजेची कमतरता लक्षात घेऊन करण्यात आली होती. स्वातंत्र्योत्तर काळात वीज बिलाची रचना याच पद्धतीने करण्यात आली होती. मात्र आता देशातील वीज निर्मिती वाढली आहे. त्यामुळे लोकांनी विजेचा अधिकाधिक वापर करावा, असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे वीज बिल आकारण्याच्या रचनेत बदल केला जाऊ शकतो,’ असे सरकारने स्थापन केलेल्या समितीतील सदस्याने म्हटले आहे.

विजेचा वापर वाढावा यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीत केंद्रीय वीज यंत्रणा, केंद्रीय वीज नियामक आयोगाचे सचिव, फिक्कीचे अध्यक्ष, बिहार, तमिळनाडूच्या उर्जा विभागाचे सचिव, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या उर्जा विभागाचे प्रमुख सचिव यांचा समावेश होता. या समितीचे त्यांचा अहवाल तयार केला असून जानेवारीच्या अखेरीस तो उर्जा मंत्रालयाला दिला जाणार आहे.

विजेचा वापर अधिकाधिक वाढावा यासाठी वीज बिलावर सवलत देण्यात यावी, वीज बिल आकारण्याच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्याच्या सूचना समितीने केल्या आहेत. या शिफारशी अंमलात आल्यास त्याचा मोठा फायदा विजेचा अधिकाधिक करणाऱ्या ग्राहकांना, उद्योगांना आणि सेवा क्षेत्राला होऊ शकतो. सध्या विजेचा अधिक वापर करणाऱ्यांकडून दंड आकारला जातो. मात्र समितीच्या सर्व शिफारशी लागू झाल्यास देशातील चित्र नेमके उलटे होईल.