कार, बाईक, लॅपटॉप किंवा एटीएम मशीन्स चोरल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील मात्र, एक भला मोठा पूलच चोरीला गेल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? नाही ना? मात्र, असंकाही झालं असेल तर हे खरंच आश्चर्य असेल. कारण, असाच एक पूल रात्रीतूनच अचानक गायब झाल्याची घटना रशियात घडली असून यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनीही या घटनेची चौकशी सुरु केली आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, चोरीला गेलेल्या या पूलाची लांबी ७५ फूट आणि वजन ५० टनांपेक्षा जास्त होते. रशियातील आर्किक्ट प्रांतातील उंबा नदीवर तो बांधण्यात आला होता. मात्र, गेल्या महिन्यांत तो आपल्या जागेवरुन बेपत्ता झाल्याची चर्चा रशियाच्या VK या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरु झाली. दरम्यान, आणखी एक विलक्षण गोष्ट म्हणजे, हा पूल न पाडताच गायब झाला असल्याचा दावा काही जणांनी केला आहे. पूल गायब होण्यापूर्वी दहा दिवस आधीची याची काही छायाचित्रेही VK वर शेअर करण्यात आली. याद्वारे या पुलाचा काही भाग हा कोसळला आणि त्याचा राडारोडा हा नदीच्या पाण्यात नाहीसा झाल्याचा दावाही करण्यात आला.

मात्र, त्यानंतर काही दिवसांनंतर या पुलाची आणखी काही छायाचित्रे व्हायरल झाली आणि त्यात पूल पडल्याची कोणतीही खून दिसून येत नसल्याचे तसेच पूलाचा राडारोडाही या छायाचित्रामध्ये दिसत नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर एक आश्चर्यकारक गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे या पुलाचा भाग नदीच्या तळाशी पडलेलाच नव्हता तर तो कोणीतरी पळवून नेला होता.

जुने छायाचित्र
पुलाचे जुने छायाचित्र

 

मात्र, स्थानिकांच्या अंदाजानुसार पुलाचा पडलेला भाग हा संपूर्ण लोखंडाचा होता. त्यामुळे तो लोखंड चोरांनी चोरून नेला असावा. या चोरांनी हा पूल खाली पाण्यात पाडल्यानंतर त्याचे तुकडे करुन ते चोरुन नेले असावेत. याच पद्धतीने हा पूल गायब झाला असावा. कारण, या भागात यापूर्वी २०१८ मध्ये कोही चोरांनी एक लोखंडाचा टॉवर चोरुन नेल्याची घटना घडली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, चोरांनीच हा पूल नेला असावा मात्र, त्यांनी कशा पद्धतीने ही चोरी केली असेल हे अद्याप कळू शकलेले नाही. या लोखंडाच्या चोरीमुळे ६ लाख रशियन रुबलचे (रशियाचे चलन) नुकसान झाल्याचेही सांगण्यात येत आहे.