माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायव्यवस्थेच्या सिद्धांतांसोबत तडजोड केली असा गंभीर आरोप कुरियन जोसेफ यांनी केला आहे. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राष्ट्रपती पुरस्कृत राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावरुन कुरियन जोसेफ यांनी ही टीका केली. याआधी न्या. मदन लोकूर यांनीही तिखट शब्दात रंजन गोगोई यांच्यावर टीका केली होती. न्यायव्यवस्थेच्या पारदर्शक सिद्धांतांसोबत रंजन गोगोई यांनी तडजोड केली असं म्हणत कुरियन जोसेफ यांनी रंजन गोगोई यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर टीका केली आहे.

“आपल्या देशात न्यायव्यवस्थेचं एक स्वतंत्र महत्त्व आहे. आपलं राष्ट्र या स्वतंत्र सिद्धांतावरच उभं आहे. मात्र जे पाऊल गोगोई यांनी उचललं त्यामुळे लोकांचा विश्वास ढळला आहे. न्यायाधीशांमध्ये एक वर्ग असाही आहे जो पक्षपाती आहे अशी धारणा गोगोईंच्या एका निर्णयामुळे निर्माण झाली आहे.

जस्टीस चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर यांच्यासोबत एक ऐतिहासिक पाऊल उचलून मी हे सांगितलं होतं की देशाची न्यायव्यवस्था धोक्यात आहे. आता मी त्यापुढे जाऊन असं सांगेन ही हे संकट अधिक गहीरं आहे. मी न्यायव्यवस्थेच्या जीवनातून निवृत्त झाल्यानंतर कोणतंही पद घ्यायचं नाही असा निर्णय घेतला. मात्र रंजन गोगोई यांचा निर्णय चक्रावून टाकणारा आहे.

न्या. लोकूर यांनी काय म्हटलं होतं?
“माजी सरन्यायाधीश गोगोई यांना आत्ता जो सन्मान मिळाला आहे, त्याची चर्चा आधीपासूनच सुरु झाली होती. त्यातच त्यांना उमेदवारी मिळणं हे आश्चर्यचकीत करणारं नाही. मात्र, हे अगदीच लवकर झालं हे आश्चर्यकारक आहे. ही बाब न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, निष्पक्षता आणि अखंडतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करतं.”

दरम्यान, गोगोई यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर भाष्य करण्यास न्या. चेलमेश्वर यांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे.जानेवारी २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाच्या चार सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले होते. त्यांनी तातडीने एक पत्रकार परिषद घेत तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर कामाच्या पद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित करीत न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचे म्हटले होते. या न्यायाधीशांमध्ये न्या. रंजन गोगोई, न्या. लोकूर, न्या. चेलमेश्वर आणि न्या. कुरियन जोसेफ यांचा सहभाग होता.