राज्य सरकारकडून स्पष्टीकरण नाही

कोलकाता : राज भवनावर पाळत ठेवून या संस्थेचे पावित्र्य कमी केले जात असल्याचा आरोप पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार यांनी रविवारी केला. या आरोपामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल यांच्यातील आधीच ताणले गेलेले संबंध कमालीचे ताणले जाण्याची शक्यता आहे.

राज भवनावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा आरोप करणाऱ्या धनखार यांनी राज्यभर कायद्याचे राज्यच राहिले नसल्याचेही म्हटले आहे. राज भवनावर पाळत ठेवण्यात येत असल्याने या संस्थेचे पावित्र्य कमी होत आहे, मात्र राज भवनाचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी आवश्यक असलेले प्रत्येक पाऊल आपण उचलणार आहोत, असेही धनखार यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

पाळत प्रकरणाची चौकशी आपण सुरू केली आहे, राज भवनाच्या कारभाराचे पावित्र्य अबाधित राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. मात्र पाळत नेमकी कोणत्या पद्धतीने ठेवली जात आहे ते त्यांनी स्पष्ट केले नाही. ज्यांनी पाळत ठेवली आहे त्याला कायद्यानुसार त्याची किंमत मोजावी लागेल, आपली अंतर्गत चौकशी लवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले. गोपनीय दस्तऐवज फुटण्याच्या प्रकारांबाबतही राज्यपालांनी भाष्य केले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त राज भवनवर आयोजित (अ‍ॅट होम) कार्यक्रमाला ममता बॅनर्जी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी हजर न राहिल्याने आपल्याला वेदना झाल्या. करोनाममुळे ३५ हून कमी जणांना निमंत्रित करण्यात आले होते, राज्य सरकारशी आपण सातत्याने संपर्क साधत होतो, करोनाच्या नियमांचे पालन करण्यात आल्याचेही बॅनर्जी यांना सांगण्यात आले होते, असेही धनखार म्हणाले.

स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या अधिकृत कार्यक्रमाला हजर राहिल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सकाळी राज भवनावर राज्यपालांची भेट घेतली होती, मात्र त्या ‘अ‍ॅट होम’ कार्यक्रमाला हजर राहिल्या नाहीत. धनखार यांनी केलेल्या आरोपांबाबत सरकारकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.