राजस्थानमध्ये सत्ताधारी भाजपाविरोधात जनतेमध्ये नाराजी असून तिथे सत्तापालट होण्याची शक्यता आहे. २०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसला ११० ते १२० जागा मिळण्याची शक्यता असून भाजपाला ७० ते ८० जागा मिळू शकतात. टाइम्स नाऊ-सीएनएक्सच्या निवडणूकपूर्व सर्वेक्षण चाचणीतून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एकूण ६७ विधानसभा मतदारसंघात ही चाचणी करण्यात आली. काँग्रेसला ४३.५ टक्के, भाजपाला ४०.३७ टक्के आणि अन्य पक्षांना १३.५५ टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. राजस्थानात काँग्रेसबरोबर आघाडीस नकार देणाऱ्या बसपाला २.८८ टक्के मतांसह १ ते ३ जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १६३ जागा जिंकून घवघवीत यश मिळवले होते.

काँग्रेसला फक्त २१ जागांवर समाधान मानावे लागले होते. आता भाजपासाठी राजस्थानमध्ये बुरे दिन असतील. राजस्थानच्या जनतेने नेहमीच भाजपा आणि काँग्रेस या दोन पक्षांना आलटून-पालटून कौल दिला आहे. बेरोजगारी हा या निवडणुकीत सर्वात महत्वाचा मुद्द रहाणार आहे. सध्या भाजपाच्या वसुंधरा राजे राजस्थानच्या मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसचे सचिन पायलट मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे या चाचणीतून समोर आले आहे.

३२ टक्के मतदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांना कौल दिला. काँग्रेसच्याच अशोक गेहलोत यांच्या नावाला १६ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली. भाजपा विरोधात जनमत असले तरी मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांना ३१ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली.