सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर यावर आता आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झालं आहे. न्यायालयाच्या निकालानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आनंद व्यक्त केला. हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहारच्या डीजीपींना झालेला आनंद पाहून त्यांनी केवळ हातात झेंडा घेणं बाकी होतं असं म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी गरज नव्हती असं मतही राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

फोटोगॅलरी >> भाजपाकडून निवडणूक लढवण्यासाठी बिहारच्या डीजीपींनी २००९ साली घेतली होती निवृत्ती; जाणून घ्या गुप्तेश्वर पांडेंचा प्रवास

पांडे काय म्हणाले?

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नसल्याचे मत पांडे यांनी व्यक्त केलं. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आज हे यश मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं.  “न्यायालयाच्या निर्णयामुळे १३० कोटी जनतेच्या मनात सर्वोच्च न्यायालयायबद्दल असलेली आस्था अजून दृढ झाली आहे. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास वाढला आहे. आता लोकांना सुशांत सिंह प्रकरणी न्याय मिळेल असा विश्वास वाटू लागला आहे,” असंही पांडे म्हणाले.  “ही संपूर्ण देशासाठी मोठी बातमी आहे. आमच्यावर अनेक आरोप केले जात होते. केस दाखल का केली अशी विचारणा होत होती. तपासासाठी अधिकाऱ्याला पाठवलं तर त्याला कैद्याप्रमाणे क्वारंटाइन करण्यात आलं. यावरुनच लोकांना काहीतरी गडबड असल्याचं वाटत होतं. आम्ही जे काही काम केलं ते कायदेशीर पद्धतीने केलं. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे,” असं पांडे यांनी सांगितलं. “मुंबई पोलिसांनी केलेला तपास अगदी चुकीचा आणि बेकायदेशीर होता. आम्ही करत असलेल्या तपासातून निकाल हाती येणारच. कारण ही फक्त एका व्यक्तीची, एका कुटुंबाची किंवा माझी वैयक्तिक लढाईनाही तर १३० कोटी जनता ज्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे त्यांची लढाई आहे,” असं पांडे यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> संजय राऊत म्हणतात, “निकालाची स्क्रीप्ट आधीपासूनच तयार असेल तर…”

राऊतांची टीका

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या वक्त्यांवरुन राऊत यांनी पांडे यांच्यावर टीका केली आहे. “बिहारच्या डीजीपींनी कोणत्या गोष्टीचा एवढा आनंद झाला आहे की ते जागोजागी नाचत नाचत सांगत सुटले आहेत. पोलिसांच्या वर्दीचा एक मान असतो. त्यांनी हातात भाजपाचा झेंडा घेणं फक्त बाकी होतं,” असं मत राऊत यांनी नोंदवल्याचं नवभारत टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. बिहारमध्ये गुन्ह्यांची संख्या कमी झाली आहे का?, असा खोचक प्रश्न विचारत राऊत यांनी पांडे यांच्यावर निशाणा साधला. तेथील अनेक प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे आम्ही सर्वांना पाहिलं आहे असंही राऊत म्हणाले.

नक्की वाचा >> कोणाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते हे महाराष्ट्र सरकारने आता तरी सांगावे : भाजपा

राऊत यांचा नितीश कुमार यांनाही टोला

संजय राऊत यांनी नितीश कुमार यांनी दिलेल्या वक्तव्यासंदर्भात बोलताना, “नितीश कुमार संयमी नेते आहेत. मात्र राजकारण सर्वांचा संयम तोडू शकतं,” असं म्हटलं आहे. “रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा येथे दाखल झालेल्या गुन्ह्याची तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली असून यामुळे सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे,” असं नितीश यांनी या निकालानंतर म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीची गरज नव्हती, मात्र बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे राजकारण केलं जात असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> सुशांत प्रकरण सीबीआयकडे देण्याच्या निर्णयावर सुब्रमण्यम स्वामींची तीन शब्दात प्रतिक्रिया; तासाभरात १७ हजार शेअर्स