News Flash

सुशांत सिंह आत्महत्या; “आतापर्यंत सीबीआय व ईडीला काय सापडलं कुणालाही माहिती नाही”

काँग्रेस नेत्याची टीका

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर सुशांतनं आत्महत्या केली नसल्याचा संशय व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी पुढे आली होती. पोलिसांनी तपासही सुरू केला होता. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून, या प्रकरणात ईडी व एनसीबी या दोन्ही संस्थाही यात गुंतल्या आहेत. मात्र, यात सध्या ड्रग्ज प्रकरण गाजत असून, सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कांग्रेसनंही यावरून प्रश्न उपस्थित केला असून, “ड्रग्ज प्रकरण हे भाजपा व मोदींच्या जवळच असल्याचं आम्ही ऐकत आहोत,” असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला आहे. आत्महत्येपासूनच या प्रकरणाचा राजकारणासाठी वापर केला जात असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

आणखी वाचा- निष्पक्ष चौकशीसाठी सीबीआयनं नवं मेडिकल बोर्ड स्थापन करावं; रियाच्या वकिलांची मागणी

“सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यनंतर सुरूवातीपासूनच भाजपा यावरून राजकारण करत आहे. कुणालाही माहिती नाही की सीबीआय, ईडीला काय सापडलं आहे. हे प्रकरण दुसरीकडे वळवण्यात आलं असून, एनसीबी सर्व अभिनेत्रींना ड्रग्ज प्रकरणात ओढत आहे,” असा आरोप चौधरी यांनी केला.

“सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यावर भर देणाऱ्या बिहारच्या माजी पोलीस महासंचालकांना आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार आहे. आम्ही असं ऐकत आहोत की, एनसीबी तपास करत असलेलं ड्रग्ज प्रकरण भाजपा व मोदी यांच्या जवळच आहे,” असा दावाही अधीर रंजन चौधरी यांनी केला.

आणखी वाचा- सीबीआय तपासावर सुशांतचं कुटुंब नाराज; वकील विकास सिंह यांचा दावा

सुशांतचं कुटुंबीय तपासावर नाराज

“ज्या प्रकारे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यावरून सुशांतच्या कुटुंबीयांना असं वाटतंय की यातून सत्य बाहेर येणार नाही. एनसीबीनंही मुंबई पोलिसांसारखच सुरू केलं आहे. एका एका कलाकाराला बोलवलं जात आहे. हा सगळा तपास मुंबई पोलिसांच्या तपासाप्रमाणेच सुरू आहे. यात सुशांतचं प्रकरण पाठीमागे पडलं आहे,” अशी माहिती अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 3:48 pm

Web Title: sushant singh rajput death case adhir ranjan choudhary congress bjp cbi ed ncb narendra modi bmh 90
Next Stories
1 निष्पक्ष चौकशीसाठी सीबीआयनं नवं मेडिकल बोर्ड स्थापन करावं; रियाच्या वकिलांची मागणी
2 “RSSची शिक्षा, दिक्षा वेगवेगळ्या लोकांच्या मुलांसाठी वेगवेगळी असते”
3 भारत-इस्रायलमध्ये अत्यंत महत्त्वाचा करार, चीन-पाकिस्तानचं टेन्शन वाढणार
Just Now!
X